‘भूल भुलैय्या’ हा चित्रपट २००७ मध्ये आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तुफान यश मिळवले. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली तयर झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, अमिषा पटेल आणि शायनी आहुजा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २०२२ मध्ये टी-सीरिजचे प्रमुख भूषण कुमार यांनी ‘भूल भुलैय्या २’ बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी विद्या बालनला पुन्हा घेण्याचा विचार केला, परंतु विद्याने याला नकार दिला होता. भूषण कुमार यांनी स्वतः याबद्दल खुलासा केला आहे आणि यामागील कारणही सांगितले आहे.
भूषण कुमार यांचा विद्या बालनबाबत खुलासा
भूषण कुमार यांनी अलीकडेच ‘भूल भुलैय्या ३’ च्या गाण्याच्या लाँचवेळी या विषयावर सांगितले. त्यांनी म्हटले, “मी ‘भूल भुलैय्या २’ साठी विद्याजींशी संपर्क साधला होता, परंतु त्यांनी नकार दिला होता. ट्रेलर लाँचवेळी आम्ही त्यांना किमान ट्रेलरचा भाग बनण्याची विनंती केली होती आणि त्यामुळे विद्या यांनी ‘भूल भुलैया २’ चा ट्रेलर शेअर केला.”
विद्या बालनबद्दल बोलताना भूषण कुमार म्हणाले, “विद्या यांना ‘भूल भुलैय्या २’चा ट्रेलर आणि चित्रपट दोन्ही आवडले होते. त्यानंतर त्यांनी मला वचन दिले की त्या नक्कीच तिसऱ्या चित्रपटाचा भाग बनतील, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता.”
मी खूप घाबरले होते – विद्या बालन
विद्या बालनने देखील यावर प्रतिक्रिया दिली. तिने सांगितले, “मी खूप घाबरले होते, कारण ‘भूल भुलैय्या’ चित्रपटाने मला खूप काही दिले आहे. मी अनीस बज्मी सरांनाही सांगितले होते की, मी जोखीम घेऊ शकत नाही. पण, जेव्हा ते ‘भूल भुलैय्या ३’ ची ऑफर घेऊन आले, तेव्हा मला स्क्रिप्ट आवडली.”
विद्या पुढे म्हणाली, “मला अनीस सर आणि भूषण कुमार यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. मला ‘भूल भुलैय्या २’ खूप आवडला होता, त्यामुळेच मी तिसऱ्या भागात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात माधुरी दीक्षित यांच्यासारखी अनुभवी अभिनेत्रीही आहे, त्यामुळे चित्रपट आणखी खास झाला आहे.”
‘भूल भुलैय्या ३’ प्रदर्शित होणार १ नोव्हेंबरला
विद्या बालन आता ‘भूल भुलैय्या ३’चा भाग आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.