भारतीय चित्रपटविश्वात अदबीने घेतलं जाणारं नाव म्हणजे विशाल भारद्वाज. दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, गायक अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे विशाल भारद्वाज यांनी आज चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘मकडी’, मकबुल’, ‘ ओमकारा’, ‘हैदर’सारख्या कित्येक हटके चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे.
याबरोबरच विशाल भारद्वाज हे निर्मातेसुद्धा आहेत. अनुराग कश्यप आणि इतर काही नवोदित लोकांचे चित्रपट विशाल भारद्वाज यांनी प्रोड्यूस केले. सध्या विशाल यांच्या आगामी ‘चार्ली चोप्रा’ ही वेबसीरिज चांगलीच चर्चेत आहे. नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. विशाल यांची ही सीरिज अगास्था क्रिस्टी यांच्या सुप्रसिद्ध नॉवेलवर बेतलेली आहे.
विशाल भारद्वाज यांचं दोन कालाकारांसह चांगलंच समीकरण जुळून आलं ते म्हणजे गीतकार, लेखक गुलजार अन् दिवंगत अभिनेता इरफान खान. विशाल भारद्वाज यांचा चित्रपट म्हंटलं की त्यात या दोघांचं छोटं का होईना पण काम असणार हे नक्की. अगदी ‘मकबुल’पासून ‘हैदर’पर्यंत बऱ्याच चित्रपटात इरफान अन् विशाल यांच्या जोडीने कमाल केली. आपल्या याच जवळच्या मित्राशी मात्र तब्बल २ वर्षं विशाल यांनी अबोला धरला होता.
आणखी वाचा : ‘जब वी मेट २’बद्दल नवीन अपडेट समोर; करीना व शाहिदच साकारणार सिक्वेलमध्ये मुख्य भूमिका
‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’मध्ये विशाल भारद्वाज यांनी नुकतीच हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला. विशाल भारद्वाज म्हणाले, “त्यावेळी माझ्या ‘ईश्कीया’ चित्रपटात इरफानला काम करायचं होतं. यासाठी त्याने होकार दिला होता. दरम्यान मी अनुराग कश्यपला त्याचा ‘नो स्मोकिंग’ चित्रपटाच्या निर्मितीत मदत केली, पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप ठरला. यानंतर जेव्हा मी ‘ईश्कीया’साठी इरफानकडे गेलो तेव्हा तो म्हणाला की त्याने त्याच्या तारखा दुसऱ्या चित्रपटासाठी दिल्या आहेत.”
पुढे ते म्हणाले, “त्यावेळी इरफान मला म्हणाला की तुझा ‘नो स्मोकिंग’ एवढा फ्लॉप ठरला की त्याला वाटलं नव्हतं की मी आता कोणता चित्रपट करण्याच्या मनस्थितीत असेन. त्यावेळी इरफानचं एक वाक्य माझ्या मनाला लागलं, म्हंटलं एक चित्रपट फ्लॉप झाला याचा अर्थ मी पुढे चित्रपटच करणार नाही असं नाही, चित्रपट हिट अन् फफ्लॉप होत असतात, पण त्यावेळी मात्र मला त्याचं बोलणं खूप लागलं. त्यानंतर मी तब्बल दोन वर्षं त्याच्याशी संपर्कच ठेवला नाही.”
यादरम्यान इरफान त्यांना फोन करायचा पण विशाल भारद्वाज यांनी त्यांचा फोन उचलला नाही. अखेर दोन वर्षांनी जेव्हा विशाल भारद्वाज जेव्हा ‘सात खून माफ’ या चित्रपटावर काम करत होते तेव्हा त्यांच्या चित्रपटातील एक पात्र साकारण्यास करायला कोणताच अभिनेता तयार होत नव्हता.
याबद्दल बोलताना ते म्हणाले, “त्यावेळी माझ्या चित्रपटातील पात्र साकारायला कुणीच तयार नव्हतं कारण ते पात्र फारच विक्षिप्त होतं, आपल्या पत्नीला मारहाण करणारे होतं. माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, मला तेव्हा इरफानची आठवण आली अन् मी त्याला फोन केला अन् पहिली रिंग वाजताच मी तो कॉल कट केला. माझा फोन पाहून इरफानने मला परत कॉल केला अन् तेव्हा मी त्याला त्या भूमिकेबद्दल विचारलं अन् त्याने आढेवेढे न घेता ते पात्र करण्यास होकार दिला.”