भारतीय चित्रपटविश्वात अदबीने घेतलं जाणारं नाव म्हणजे विशाल भारद्वाज. दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, गायक अशा वेगवेगळ्या भूमिका निभावणारे विशाल भारद्वाज यांनी आज चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘मकडी’, मकबुल’, ‘ ओमकारा’, ‘हैदर’सारख्या कित्येक हटके चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे.
याबरोबरच विशाल भारद्वाज हे निर्मातेसुद्धा आहेत. अनुराग कश्यप आणि इतर काही नवोदित लोकांचे चित्रपट विशाल भारद्वाज यांनी प्रोड्यूस केले. सध्या विशाल यांच्या आगामी ‘चार्ली चोप्रा’ ही वेबसीरिज चांगलीच चर्चेत आहे. नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. विशाल यांची ही सीरिज अगास्था क्रिस्टी यांच्या सुप्रसिद्ध नॉवेलवर बेतलेली आहे.
आणखी वाचा : मोहित रैनाच्या ‘द फ्रीलान्सर’ या वेबसीरिजचे हृतिक रोशनने केले तोंडभरून कौतुक; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
नुकतंच त्यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली अन् त्यांच्या चित्रपटक्षेत्रातील प्रवासावर भाष्य केलं. आजवर विशाल भारद्वाज यांनी केलेले बहुतेक चित्रपट हे इंग्रजी साहित्यावर तसेच शेक्सपीअरच्या नाटकांवर बेतलेले आहेत अन् यामुळेच ते कायमच ‘अडॅप्शन’वर फार जास्त लक्षकेंद्रित करतात असा आरोप बऱ्याचदा त्यांच्यावर लागला आहे. याविषयीच विशाल भारद्वाज यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे.
विशाल म्हणाले, “त्या साहित्यात अन् नाटकात एक तयार गोष्ट आपोआपच मिळते. मला फक्त त्यातील पात्रांना आपलंसं करायचं असतं. त्यात बरंच काही लिहून ठेवलेलं असतं, खूप मजेशीर गोष्टी असतात. मला जे काम उत्तम जमतं मी त्यावर लक्ष देतो, मला दिग्दर्शन उत्कृष्ट जमतं, मला गोष्टींचं अडॅप्शन उत्तम जमतं. मी थोडा आळशी माणूस आहे यामुळेच अडॅप्शन करून माझं भागतं.” विशाल यांनी ‘चार्ली चोप्रा’ ही सीरिज २७ सप्टेंबरपासून सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.