दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला अडीच वर्ष झाली आहेत. तपास यंत्रणांच्या मते अभिनेत्याने आत्महत्या केली होती. अशातच त्याचं पोस्ट मॉर्टम झालेल्या कूपर रुग्णालयातील कर्मचारी रूपकुमार शाहने सुशांतच्या हत्येचा दावा केला होता. त्यानंतर सुशांत प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी होत आहे. अशातच तब्बल अडीच वर्षांनी सुशांतच्या शरीरांवर जखमांचे व्रण पाहिल्याचा दावा करणाऱ्या रूपकुमार शाह यांचे जबाब नोंदवले जात आहेत. त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याची त्यांनी दिलेली उत्तरं गोंधळात टाकणारी आहेत.
रुपकुमार शाह यांच्याशी ‘आज तक’ने संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की सुशांतच्या कुटुंबीयांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टवर कोणतेही प्रश्न का उपस्थित केले नाहीत? पण या प्रश्नाचं उत्तर रूपकुमारकडे नव्हतं. सुशांतच्या डोळ्यांवर मार लागला होता आणि त्याच्या मानेवरच्या खुणा फाशीच्या नसल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच रूपकुमार शाह यांना सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांबाबत विचारले असता, त्यांच्याकडे त्याचंही उत्तर नव्हतं. डॉक्टरांची नावं आठवत नसल्याचं रूपकुमार यांनी सांगितलं. डॉक्टरांनी पीपीटी किट घातल्या होत्या, त्यामुळे आपण त्यांना ओळखू शकलो नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.
सुशांतची हाडं मोडली होती आणि त्यांनी ती पाहिली होती, असा दावाही रूपकुमार शाह यांनी केला होता. त्यावर ‘या गोष्टी सुशांतचे कुटुंब, त्याच्या बहिणी आणि भावोजींच्या लक्षात का आल्या नाहीत?’ असा प्रश्न विचारण्यात आला. पण रुपकुमार शाह यांच्याकडे त्याचंही उत्तर नव्हतं. जेव्हा रूपकुमार यांना सांगण्यात आलं की सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूच्या कारणावर कधीच शंका आली नाही, तेव्हा शाह म्हणाले, “कदाचित त्याच्या कुटुंबाला हे सर्व माहीत नसेल. मी वर्षानुवर्षे मृतदेह पाहतोय, त्यांच निरीक्षण केलंय, त्यामुळे मला याचा अनुभव आहे.” तसेच एवढं सगळं माहीत होतं, मग तुम्ही अडीच वर्षे गप्प का बसले, असा प्रश्न विचारल्यावर त्यांच्याकडे कोणतंच सबळ कारण नव्हतं. महाराष्ट्राच्या तत्कालीन सरकारवर विश्वास नसल्याने आपण गप्प बसल्याचं ते म्हणाले.