अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगचा पहिला दिवस आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाने गाजवला. तर, दुसऱ्या दिवशी बॉलीवूडकरांची व खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतलं ते बॉलीवूडच्या तिन्ही खाननी. सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान हे तिघेही एकाच मंचावर एकत्र नाचले. तिघांनी एकमेकांच्या सिग्नेचर स्टेपही केल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तिघांनी एकत्र चित्रपट करावा याची चर्चा सुरू झाली.
सोशल मीडियावर यानंतर शाहरुखचा एक जुना व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला ज्यात त्याने तिघांना एकत्र घेऊन चित्रपट करणं अशक्य असल्याचं सांगितलं होतं. यामुळे शाहरुखलाही बरंच ट्रोल केलं गेलं. जे इतरांना शक्य झालं नाही ते अंबानींनी करून दाखवलं असं म्हणत या तीन खान मंडळींचा नाचतानाच व्हिडीओ लोकांनी शेअर केला. आता नुकतंच आमिर खानने यावर भाष्य केलं आहे. सलमान आमिर आणि शाहरुख हे तिघे मिळून एकत्र कधी काम करणार याबद्दल आमिर स्पष्टपणे बोलला आहे.
नुकताच आमिर खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या पत्रकारांना आमंत्रण देऊन त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना आमिर म्हणाला, “मलाही मनापासून वाटतं की आम्ही तिघांनी एकत्र एका चित्रपटात काम करावं. आम्ही जेव्हा एकत्र भेटातो तेव्हादेखील आम्ही याबद्दल चर्चा करतो, आम्ही तिघांनी एकत्र एखाद्या चित्रपटात यायचा प्रयत्न करायला हवा असं आम्हालाही जाणवतं. आता पुढे काय होतंय काय माहीत, एखादी चांगली कथा आम्हाला मिळाली अशी आशा करतो. मला असं वाटतं की आम्ही तिघेही एकमेकांबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. बरीच वर्षे याबद्दल विचारणा होत आहे, मला वाटतं की हीच ती योग्य वेळ आहे.”
आमिर, सलमान आणि शाहरुख हे तिघे आशुतोष गोवारीकर याच्या ‘पेहला नशा’ या चित्रपटात एकत्र दिसले होते तेदेखील एक पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत. त्यानंतर हे तिघे एकत्र मोठ्या पडद्यावर कधीच एकत्र आले नाहीत. आमिर आणि सलमान यांनी नंतर ‘अंदाज अपना अपना’मध्ये काम केलं तर सलमान आणि शाहरुख यांनी नंतर ‘करण अर्जुन’, ‘हम तुम्हारे है सनम’सारख्या चित्रपटात काम केलं. पण अद्याप या तिघांनी मिळून एकाही चित्रपटात काम केलं नाही. आमिरने मीडियाशी संवाद साधताना आगामी ‘सितारे जमीन पर’ आणि ‘अंदाज अपना अपना’च्या सीक्वलबद्दलही भाष्य केलं.