१० वर्षं जुन्या वादग्रस्त गाण्याच्या प्रकरणात प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंगला दिलासा मिळाला आहे. १० वर्षांपूर्वी आलेल्या हनी सिंगच्या ‘मैं हूं बलात्कारी’ या गाण्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता, इतकंच नव्हे तर त्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारने गायकाविरुद्धची ही तक्रार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी हनी सिंगने याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
‘मैं हूं बलात्कारी’ या गाण्यासाठी हनी सिंगवर नवांशहरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गाण्यातील वादग्रस्त शब्दांमुळे हा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर हनी सिंगने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तत्कालीन पंजाब सरकारकडे याचे उत्तर मागितले होते. कारवाई करायचीच असेल तर सात दिवसांत नोटीस सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सांगितले.
आणखी वाचा : रणबीरचा ‘अॅनिमल’ पाहून अर्शद वारसीने मानले नीतू आणि ऋषी कपूर यांचे आभार; म्हणाला, “हा मास्टरपीस…”
न्यायालयाला दिलेल्या उत्तरात पंजाब सरकारने हे प्रकरण रद्द करण्यासाठी अहवाल तयार करत असल्याचे सांगितले. शिवाय लवकरच ते या प्रकरणाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचेल असेही नमूद करण्यात आले. याचाच अर्थ या प्रकरणात हनी सिंगला दिलासा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सामाजिक कार्यकर्ते परविंदर सिंह यांनी ‘मैं हूं बलात्कारी’ या गाण्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांनी हनी सिंगविरुद्ध अश्लीलता पसरवण्याबद्दल आणि अश्लील शब्द गाण्यात वापरण्याबद्दल तक्रार केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते.
हानी सिंगने सादर केलेल्या याचिकेत असे सांगण्यात आले हे गाणे वास्तविक हनी सिंगने गायलेलेच नव्हते. एका फेक आकाऊंटच्या माध्यमातून हे गाणे सादर करण्यात आल्याचा खुलासा या याचिकेतून झाला अन् म्हणूनच हनी सिंगने आपल्या विरुद्ध केलेली तक्रार रद्द करण्यासाठी विनंती केली होती. या दाव्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची फॉरेन्सिक तपासणी करण्याचेही आदेश दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हनी सिंगच्या याचिकेत नेमकं तथ्य किती हे जाणून घेण्यासाठी ही तपासणी होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.