‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असतानाच ६ जून रोजी चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तासाभरातच या ट्रेलरला लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. हा ट्रेलर पाहून काहींनी सैफ अली खानचं कौतुक केलं तर काहींनी प्रभासच्या अभिनयावर आणि एकूणच व्हीएफएक्सवर जोरदार टीका केली.
या चित्रपटामुळे बराच वाद निर्माण झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवेल अशी अपेक्षा बऱ्याच लोकांना आहे. काही लोकांनी हा चित्रपट पहिल्याच दिवशी ५० कोटींहून अधिक कमाई करेल अशी शक्यता वर्तवली आहे. अशातच काही सिनेतज्ज्ञांच्या मते हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘पठाण’लाही मागे टाकू शकतो.
आणखी वाचा : चित्रीकरणादरम्यान अर्चना जोगळेकरवर चाहत्याने केलेला बलात्काराचा प्रयत्न; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जगभरात १०६ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे प्रभासची स्टार पॉवर बघता ‘आदिपुरुष’ हा सहज ‘पठाण’चा पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘आदिपुरुष’ला बऱ्याच गोष्टींमुळे विरोध झाला असला तरी हा चित्रपट ‘पठाण’चे रेकॉर्ड ब्रेक करून नवे विक्रम रचेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
‘आदिपुरुष’ १६ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत चांगली उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ४०० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट किती विक्रम मोडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.