Kangana Vs Subramniam Swami : अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. त्याचप्रमाणे तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादही निर्माण झाला आहे. अशात आता कंगनाने खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना खडे बोल सुनावले आहेत. विजयादशमीच्या दिवशी कंगना रणौतने लाल किल्ल्याजवळच्या मैदानातल्या रामलीला समारंभाला उपस्थिती दर्शवली होती. या ठिकाणी तिने बाण चालवून रावण दहन केलं. अशा पद्धतीने रावण दहन करण्याचा मान मिळालेली कंगना ही पहिली महिला ठरली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी महिलेकडून रावण दहन करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर कंगना आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यात जुंपली आहे.
काय आहे हे प्रकरण?
कंगना रणौतचा धनुष्यबाण चालवत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्यानंतर तिला काही जणांनी ट्रोल केलं. सुब्रमण्यम स्वामी यांनी मोनिका नावाच्या एका युजरने पोस्ट केलेला कंगनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये कंगनाने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. ही कंगना आहे का? असा प्रश्न त्या युजरने विचारला आहे. हीच पोस्ट शेअर करत कंगनाला रामलीला महोत्सवात बोलवणं आणि रावण दहन तिच्या हस्ते करणं चुकीचं आहे असं म्हटलं आहे. त्यावर कंगनाने त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
काय म्हटलं आहे कंगनाने?
कंगनाला सुब्रमण्यम स्वामींचं म्हणणं मुळीच पटलेलं नाही. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे “स्विमसूटमधला एक फोटो आणि घाणेरडी स्टोरी लिहून तुम्ही मला सल्ला देत आहात? राजकारणात तुम्ही हे काय करत आहात? मी हिंदी सिनेमासृष्टीतली महान कलाकार आहे. मी लेखिका, दिग्दर्शक, निर्माती आणि क्रांतीकारी आहे. तुम्ही काय सांगू पाहात आहात माझ्याकडे माझ्या शरीराशिवाय काही नाही हेच ना? लक्षात ठेवा महिला फक्त सेक्स करण्यासाठी नसतात. त्यांच्याकडे हात, पाय, मेंदू, हृदय असे सगळे अवयव असतात. बाकी सगळं जे पुरुषाकडे असतं किंवा एक महान नेता बनण्यासाठी जरुरी आहे ते आमच्याकडे असतं मग आम्ही ते का बनू नये? सुब्रमण्यमजी उत्तर द्याल? ” असं म्हणत कंगनाने स्वामी यांच्यावर टीका केली आहे.
कंगनाचा तेजस हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे असंही सोशल मीडियावर कंगनाची चर्चा आहे. अशात तिच्या रामलीला मैदानातील रावण दहन कार्यक्रमावरुन तिच्यावर टीका होताना दिसते आहे. मात्र या टीकेची पर्वा कंगनाने केलेली नाही. तिने सुब्रमण्यम स्वामींसह सगळ्यांनाच सडेतोड उत्तर दिलं आहे.