‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसदानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. यापैकी शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील फर्स्ट लूकची प्रेक्षकांनी प्रशंसा केली. ‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
गेले बरेच दिवस शाहरुखच्या ‘जवान’च्या सेटवरील बरेच फोटो लीक होत होते. आजही शाहरुख आणि दीपिका पदूकोण यांच्यावर एक गाणं चित्रपटासाठी चित्रित केल्याची बातमी समोर आली. दीपिकाचा कॅमिओ यात आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचं चित्रीकरण पकडून अखेर शाहरुख खानच्या ‘जवान’चं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
आणखी वाचा : शहनाझ गिलकडे दुर्लक्ष करणं जान्हवी कपूरला पडलं महागात; ट्रोल करत नेटकरी म्हणाले “नेपोकिड्सची…”
पिपींग मूनच्या रीपोर्टनुसार ‘जवान’दरम्यान आणखी एक वेगळाच विक्रम शाहरुखने रचला आहे. आजवर सर्वात जास्त दिवस चित्रित केला गेलेला हा शाहरुखचा पहिला चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे. ‘जवान’चं चित्रिकरण १८० दिवस सुरू होतं. सप्टेंबर २०२१ मध्ये याचं चित्रीकरण सुरू झालं. पुणे, हैद्राबाद, चेन्नई अशा वेगवेगळ्या शहरात याचं चित्रीकरण पार पडलं.
कोविडमुळे चित्रीकरणात बराच वेळ गेला, शिवाय मध्यंतरी हा चित्रपट जून ऐवजी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं होतं. आत्ता चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून याचं डबिंग, व्हीएफएक्स, पोस्ट प्रोडक्शनचं सगळंच काम बाकी असताना हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होईल की नाही याबद्दल कुणीच स्पष्टपणे सांगितलेलं नाही.
आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण सीझन ८’साठी करण जोहरही आहे उत्सुक; पहिल्या भागात दिसू शकतं ‘हे’ लाडकं जोडपं
मीडिया रीपोर्टनुसार दिग्दर्शक अॅटलीने याच्या ट्रेलर आणि टीझरवर काम सुरू केलं आहे, त्यामुळे शाहरुख खानचा ‘जवान’ येत्या जूनमध्येच प्रदर्शित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. या चित्रपटाचं प्रमोशनही लवकरच सुरू होणार असल्याचं म्हंटलं जात आहे.