ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.
एकीकडे या चित्रपटाला जबरदस्त विरोध होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाने जगभरात १४० कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे. ओम राऊतच्या दिग्दर्शनावर लोकांनी चांगलीच टीका केली आहे. चित्रपटातील हनुमानाच्या तोंडी असलेल्या संवादांवरही लोकांनी आक्षेप घेतला. निर्माते आणि लेखक यांनी हा विरोध पाहता त्यातील काही वादग्रस्त संवाद बदलायचे ठरवले आहे. संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी हे संवाद आजच्या पिढीला समोर ठेवून लिहिल्याचंही कबूल केलं.
आणखी वाचा : “कोणाच्याही धार्मिक भावना…” अनुराग ठाकूर यांचं ‘आदिपुरुष’ वादावर मोठं वक्तव्य; सरकारच्या वतीने मांडली बाजू
आता त्यांनी हनुमानाच्या तोंडी असलेल्या एका संवादाबद्दल आणखी एक मोठा खुलासा केला आहे. चित्रपट हनुमान इंद्रजीतला उद्देशून म्हणतात, “तेल तेरे बाप का, कपडा तेरे बाप का, आग तेरे बाप की तो जलेगीभी तेरे बाप की!” या संवादांवर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला. पण ह्या ओळी मनोज मुंतशीर यांनी तयार केलेल्या नसून बरेच मोठमोठे निरूपणकार, कथावाचक या ओळी वापरतात असा दावा मनोज यांनी केला आहे.
‘द लल्लनटॉप’शी संवाद साधतांना मनोज मुंतशीर म्हणाले, “बजरंग बली यांनी मेघनाथशी बोलताना जो संवाद होता तो रावणाला उद्देशून होता. मी गेल्या काही दिवसांपासून बघतो आहे की रावणाप्रती बऱ्याच लोकांच्या मनात प्रचंड स्नेह पाहायला मिळतो आहे. तुम्ही गुगलवर शोधा किंवा मी तुम्हाला काही अशा क्लीप्स पाठवेन ज्यात तुम्हाला दिसेल की आपल्या देशातील मोठमोठे कथावाचक यांनी याच ओळींचा वापर केला आहे. या माझ्या ओळी नाहीत, किंवा हा संवाद मला सुचलेला नाही. असे कथावाचक ज्यांच्याकडे आपण फार सन्मानाने पाहतो त्यांनीदेखील “तेल तेरे बाप का, आग तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की” याच ओळींचा वापर केलेला आहे.”