Year Ender 2024: २०२४ वर्ष संपण्यासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यानंतर २०२५ या नव्या वर्षात पदार्पण केलं जाणार आहे. २०२४ हे वर्ष सगळ्यांना सुख, दुःख असं संमिश्र अनुभव देऊन गेलं. यंदा काही जणांनी जगाचा निरोप घेतला. तर काहींनी आयुष्याची नवी सुरुवात केली. तसंच काहींच्या घरात पाळणा हलला. आज आपण २०२४मध्ये कोणते बॉलीवूड कलाकार आई-बाबा झाले? हे जाणून घेऊयात…
विक्रांत मेस्सी
‘छपाक’, ‘हसीन दिलरुबा’, ’12th फेल’, ‘सेक्टर ३६’ असे सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता विक्रांत मेस्सी यंदा २०२४मध्ये बाबा झाला. ७ फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस बाळाला जन्म दिला. अभिनेत्याने आपल्या लाडक्या लेकाचं नाव ‘वरदान’ ठेवलं आहे. विक्रांतने आपल्या हातावर लेकाचं नाव आणि त्याच्या जन्मतारखेचा टॅटू काढला आहे.
अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यावर्षी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. अनुष्का आणि विराटला १५ फेब्रुवारीला मुलगा झाला. ही आनंदाची बातमी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. ‘अकाय’ असं अनुष्काच्या मुलाचं नाव आहे. हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’ होतो; ज्याला कोणतंही स्वरुप, देह व आकार नाही असा निराकार. तसंच तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र असा होतो.
यामी गौतम
लग्नाच्या अडीच वर्षानंतर अभिनेत्री यामी गौतम आई झाली. तिने ४ जून २०२१मध्ये लोकप्रिय दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केलं होतं. ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या सोहळ्यादरम्यान अभिनेत्रीने गर्भवती असल्याचं जाहीर केलं. यावेळी तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसला. त्यानंतर काहीही महिन्यांनी १० मेला यामीने एका गोंडस बाळाला जन्म दिला; ज्याचं नाव ‘वेदविद’ असं आहे. वेद जाणणार, असं ‘वेदविद’ नावाचा अर्थ आहे. हे भगवान विष्णू, भगवान शिव आणि भगवान राम यांचं देखील नाव होतं.
वरुण धवन
बॉलीवूडचा ‘हँडसम हंक’ आणि ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा वरुण धवनच्या घरी यंदा लक्ष्मी आली. ३ जूनला वरुणची पत्नी नताशा दलालने मुलीला जन्म दिला. लग्नाच्या तीन वर्षांनंतर वरुण धवन आणि नताशा दलाल आई-बाबा झाले. अभिनेत्याने लेकीचं नाव ‘लारा’ असं ठेवलं आहे. ‘लारा’ लॅटिन, ग्रीक आणि रशियन शब्द आहे. याचा अर्थ सुंदर आणि तेजस्वी असा होतो. तसंच ‘लारा’चा अर्थ वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळा आहे.
रिचा चड्ढा-अली फैजल
बॉलीवूडची लोकप्रिय जोडी रिचा चड्ढा आणि अली फैजल यांच्या घरी यंदा चिमुकलीचं आगमन झालं. १६ जुलैला रिचा आणि अलीला मुलगी झाली. दोघांनी आपल्या मुलीचं नाव ‘जुनैरा इदा फैजल’ असं ठेवलं आहे. ‘जुनैरा’ हा एक अरेबी शब्द आहे; ज्याचा अर्थ ‘गाइडिंन लाइट’ असा होतो. तर इंग्रजीत ‘फ्लावर ऑफ पॅराडाइज’ असा होतो. रिचा आणि अली दोघं लेकीला लाडाने जूनी अशी हाक मारतात.
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह
लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पहिल्यांदा आई-बाबा झाले. ८ सप्टेंबरला दीपिका पादुकोणने गोंडस मुलीला जन्म दिला. दीपिकाने डिलिव्हरी होण्याआधी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. दीपिका-रणवीर आई-बाबा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाच वातावरण पसरलं होतं. काही दिवसांनंतर दीपिकाने सोशल मीडियाद्वारे लेकीचं नाव जाहीर केलं. ‘दुआ’, असं दीपिका-रणवीरच्या लेकीचं नाव आहे. ‘दुआ’चा अर्थ प्रार्थना असा होतो.
मसाबा गुप्ता-सत्यदीप मिश्रा
बॉलीवूडची लोकप्रिय फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ता ऑक्टोबर महिन्यांत आई झाली. ११ ऑक्टोबरला तिने मुलीला जन्म दिला. लग्नाच्या वर्षभरानंतर मसाबा आणि सत्यदीप आई-बाबा झाले. अजूनपर्यंत दोघांनी लेकीचं नाव जाहीर केलेलं नाही.