YJHD Re Release Box Office Collection : रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपट ३१ मे २०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमातली गाणी असो किंवा संवाद सगळ्या गोष्टी आजही सिनेप्रेमींच्या अगदी तोंडपाठ आहेत. बाहेरगावी विविध देशांमध्ये फिरणं, पॅशन, करिअर या सगळ्यात बांधला गेलेला बनी आणि त्याची गाडी पुन्हा एकदा रुळावर आणणारी स्कॉलर नैना या दोघांची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.
रणबीर-दीपिकाची पहिली भेट चित्रपटात मनालीला ट्रेकला जाताना होते. मुळात शांत आणि संयमी अशी नैना ( YJHD ) पहिल्यांदाच मित्रांबरोबर इतक्या दूरवर फिरायला जाते. यानंतर ती बनीच्या प्रेमात पडते. पण, त्याच्या आयुष्यातलं बाहेरगावी जाण्याचं ध्येय लक्षात घेऊन ती आपलं प्रेम व्यक्त करत नाही. यानंतर या दोघांची भेट पुन्हा एकदा काही वर्षांनी अदितीच्या लग्नात होते. या अदितीची भूमिका कल्कीने साकारलीये. तर, आदित्य रॉय कपूर चित्रपटात अवी या बनीच्या जवळच्या मित्राच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा : Video : उमेश कामतने घेतली ‘ही’ बाईक; पत्नी प्रिया बापटसह केली पूजा, व्हिडीओ शेअर करत दाखविली पहिली झलक
YJHD सिनेमाने किती कोटी कमावले?
‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट अनेकांसाठी आदर्श ठरला होता. यावरुन या सिनेमाची क्रेझ किती मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात येतं. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलेलं आहे. तर, करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. धर्मा प्रोडक्शनने या नव्या वर्षात जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
‘ये जवानी है दीवानी’ २०१३ मध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यामुळे पुन्हा प्रदर्शित झाल्यावर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर करण जोहरने स्वत: पोस्ट शेअर करत रि-रिलीज झाल्यावर चित्रपटाचं किती कलेक्शन झालं याची आकडेवारी जाहीर केली आहे.
‘ये जवानी है दीवानी’ सिनेमाने रि-रिलीजनंतर पहिल्या दिवशी १.१५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.२५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २.८५ कोटींची कमाई केली. यामुळे पुन्हा प्रदर्शित होऊन सुद्धा या सिनेमाने फक्त तीन दिवसांत तब्बल ६.२५ कोटी कमावले आहेत.
“११ वर्षानंतर सुद्धा तुमचं प्रेम तसंच आहे. काहीच नाही बदललं…खूप खूप आभार. युके आणि भारतात तुम्ही ‘ये जवानी है दीवानी’ (YJHD ) हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहू शकता” अशी पोस्ट ‘धर्मा मुव्हीज’कडून शेअर करण्यात आली आहे.