युट्यूबर अरमान मलिक गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. दोन बायका एकाच वेळी गरोदर असल्याने अरमान मलिकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याचे दोन्ही पत्नींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोन पत्नींमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या युट्यूबरबाबत गायक अरमान मलिकने ट्वीट केलं होतं. सारखं नाव असल्यामुळे अरमान मलिकने त्याच्यावर संताप व्यक्त केला होता.
“त्याला अरमान मलिक म्हणणं बंद करा, त्याचं खरं नाव संदीप आहे. माझ्या नावाचा इतका दुरुपयोग पुरेसा आहे. सकाळी उठल्यावर अशा बातम्या वाचून वैताग येतो,” असं अरमानने म्हटलं होतं. त्याच्या या ट्वीटवर युट्यूबर अरमान मलिक व त्याच्या पत्नींनी नाराजी व्यक्त केली आहे. गायक अरमान मलिकच्या ट्वीटनंतर युट्यूबरच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली होती. ” “माझ्या नवऱ्याची लहानपणापासून दोन नावं आहेत. प्रसिद्ध होण्याआधीही लोक त्यांना याच नावाने ओळखत होते”, असं युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायलने म्हटलं होतं. आता गायक अरमान मलिकच्या या ट्वीटवर युट्यूबरने प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूबर अरमान मलिकने त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हेही वाचा>> गायक अरमान मलिकला दोन बायका असलेल्या युट्यूबरच्या पत्नीने सुनावलं, म्हणाली “माझ्या नवऱ्याची…”
“अरमान मलिक या नावाच्या जगात अनेक व्यक्ती आहेत. तुझं नाव ऐकून मी माझं नाव ठेवलं असं जर तुला वाटत असेल…तर एक सांगतो मी तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. लहानपणापासूनच माझी संदीप व अरमान अशी दोन नावं आहेत. मी अन्नू मलिक यांची गाणी लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यांचा मी चाहता आहे. जेवढं प्रेम आम्ही त्यांच्यावर करतो तेवढंच मी तुमच्यावरही करतो. पण तुमच्या ट्वीटमुळे मी नाराज आहे. मी जे काही कमावलं आहे, ते स्वत:च्या हिमतीवर केलं आहे. तुमच्यासारखी घरातून प्रसिद्धी मला मिळालेली नाही. मी छोट्या व्हिडीओपासून सुरुवात करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे. माझ्यासारखे कष्ट तुला करायले लागले असते, तर आज कदाचित तुला कोणी ओळखलंही नसतं”, असं युट्यूबर म्हणाला आहे.
पुढे यु्ट्यूबर “मला फक्त एवढचं म्हणायचं आहे की दुसऱ्यांवर जळणं बंद कर. तुझ्या नावाचा गैरवापर मी केलेला नाही. तसं असतं तर मी माझ्या व्हिडीओच्या थंबनेलवर तुझा फोटो लावला असता. पण मी तसं काहीही केलेलं नाही. तुझी गाणी मला आवडतात असंही नाही. अन्नू मलिक यांच्यामुळे आम्ही तुला ओळखतो. तुझं नाव पण मी काही दिवसांपूर्वी सर्च केलं. धक्का मारुन आम्हाला कोणीही बॉलिवूडमध्ये स्टार बनवलेलं नाही. आम्ही स्वत:च्या मेहनतीवर स्टार बनलो आहे. त्यामुळे गर्व तेव्हाच करा, जेव्हा तुम्ही स्वत:ने गोष्टी मिळवल्या असतील. लिहिण्याच्या आधी विचार कर. कारण उत्तर आम्हालाही देता येतात”, असंही म्हणाला आहे.