मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार अभिनयाबरोबरच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत. तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्रार्थना बेहेरे, निरंजन कुलकर्णी, अनघा अतुल या कलाकार मंडळींनी कपडे, साड्या, हॉटेल असे आपले विविध व्यवसाय सुरू केले आहेत. या यादीत आता ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगेचं नाव जोडलं गेलं आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर अभिनेत्रीने तिच्या नव्या व्यवसायासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.
सागरिका घाटगेने मराठीसह बॉलीवूडमध्येही काम केलं आहे. ‘चक दे इंडिया’ चित्रपटाच्या निमित्ताने सागरिकाला थेट शाहरुख खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. २०१७ मध्ये अभिनेत्रीने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानबरोबर लग्न केलं. लग्नानंतर काही काळ मनोरंजनविश्वातून ब्रेक घेतल्यानंतर आता सागरिकाने तिच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली आहे.
हेही वाचा : “त्या ऑस्ट्रेलियाची अशी…”, विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल सिद्धार्थ चांदेकरने मांडलं मत; म्हणाला…
सागरिकाने नुकताच कपड्यांचा नवीन ब्रँड लॉन्च केला आहे. ‘अकुती’ असं तिच्या नवीन ब्रँडचं नावं आहे. मुंबईत पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात अभिनेत्रीने नवनवीन ड्रेस आणि साड्यांची झलक तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. पारंपरिक साड्यांना आधुनिक वेस्टर्न टच देत तिने हा नवा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात अभिनेत्रीला तिची आई उर्मिला यांची मोठी साथ लाभली.
हेही वाचा : Video : ट्रॅफिकमध्ये अडकल्या मिसेस उपमुख्यमंत्री, वेळ घालवण्यासाठी गाडीत केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले…
नव्या व्यवसायाची झलक शेअर करत सागरिका लिहिते, “माझी आई माझा सगळ्यात मोठा पाठिंबा आहे. तिचा माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे. तिच्या साड्यांवर नेहमीच विविध रंगांच्या फुलांची चित्र आणि अनोखं नक्षीकाम केलेलं असायचं. यामधूनच मला प्रेरणा मिळाली. आमच्या या सुंदर साड्या आई आणि मी डिझाईन केल्या आहेत.” दरम्यान, कपड्यांच्या या नव्या व्यवसायासाठी सागरिकाला तिच्या मित्र-मैत्रिणींसह चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.