झीनत अमान ही अशी अभिनेत्री आहे जिला आजही ‘सत्यम शिवम सुंदरम’ या सिनेमातल्या ‘रुपा’ या व्यक्तिरेखेसाठी ओळखलं जातं. राज कपूर दिग्दर्शित सिनेमात तिच्यावर चित्रित झालेलं ‘सत्यम शिवम सुंदरम’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या तसंच्या तसं स्मरणात आहे. पांढऱ्या पारदर्शक साडीवजा कपड्यांमध्ये एका बाजूला केसांची बट घेतलेली आणि शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणारी ‘रुपा’ अर्थात झीनत अमान. आज याच झीनतचा वाढदिवस आहे. हिंदी सिनेसृष्टीत पारंपरिक अभिनेत्रीची ‘इमेज’ मोडून हॉट अभिनेत्री, बोल्ड अभिनेत्री बनण्याचं श्रेय जातं ते झीनत अमानकडे.
‘सत्यम शिवम सुंदरम’साठी १०० ऑडिशन
राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटासाठी १०० मुलींची ऑडिशन घेतली होती. मात्र त्यातून कुणीही निवडलं गेलं नाही. तसंच हेमा मालिनी यांनाही या भूमिकेबाबत विचारणा झाली होती. मात्र त्यांनीही ही भूमिका करण्यास नकार दिला.
‘सत्यम शिवम सुंदरम’ हा तिचा पहिला सिनेमा नव्हता. मात्र यातला तिचा बोल्डनेस प्रेक्षकांची झोप उडवणारा ठरला. जेव्हा झीनत अमान यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी तो मेकअप केला आणि त्या कॅमेराला सामोऱ्या गेल्या. त्यांनी अर्धी लढाई तिथेच जिंकली होती आणि नंतर त्या निवडल्या गेल्याच. अर्धा चेहरा जळालेल्या मुलीचं हे पात्र होतं जे लोकांच्या आजही स्मरणात आहे. सत्यम शिवम सुंदरम सिनेमा सुपरहिट ठरला आणि झीनत अमान स्टार झाल्या.
देवानंद, राजेश खन्ना, अमिताभ यांच्यासह केलं काम
झीनत अमान यांनी देवानंद, राजेश खन्ना यांच्यासह विविध चित्रपटांमध्ये काम केलं. ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘यादों की बारात’, ‘धुंद’, ‘अजनबी’ अशी कितीतरी नावं घेता येतील ज्यात झीनत अमान यांची हटके कामगिरी दिसली. पडद्यावर बोल्ड लूक आणि त्या लूकला साजेसा अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य ठरलं. ‘हरे रामा, हरे कृष्णा’ मधलं ‘दम मारो दम गाणं’ आठवा त्या काळात हिप्पी लोकांचा जो ट्रेंड जगात आला होता तो झीनतने तिच्या लूकमध्ये व्यवस्थित उचलला होता आणि तशी वाटलीही. ‘डॉन’ मधली तिची रोमा आणि खयके पान बनारस वाला या गाण्यातला तिच्या अदा या दोन्ही हिट ठरल्या. या सगळ्या गोष्टी घडल्या असल्या तरीही स्टारडम मिळालं ते बोल्ड भूमिकांमुळेच. ‘अलीबाबा चालीस चोर’मधली ‘मर्जीना’, ‘लावारीस’मधली ‘मोहिनी’ ‘कुर्बानी’ मधली शीला आणि तिच्यावर चित्रित झालेलं आप जैसा कोई मेरे जिंदगीमें आये.. तो बात बन जाए गाणं असो किंवा ‘इन्साफ का तराजू’ सिनेमातला बलात्कारासारखा प्रसंग असो झीनत अमान कायमच चर्चेत राहिली. तिचं ग्लॅमरस दिसणं आणि जे कपडे ती घालते आहे ते तिने तसे कॅरी करुन दाखवणं या गोष्टी तिच्या काळात तिलाच जमल्या. हिंदी सिनेमात हेलन, बिंदू, अरुणा इराणी या अभिनेत्रींवर चित्रित एखादं बोल्ड गाणं असायचं. अभिनेत्री मात्र अशी गाणी किंवा चित्रपटातले प्रसंग करताना दिसायची नाही. ही प्रथा मोडण्याचं श्रेय झीनत अमानलाच जातं.
झीनत अमान यांचं वक्तव्य चर्चेत
झीनत अमान यांना नुकतीच सिनेमासृष्टीत ५० वर्षे झाली. त्यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट झीनत अमान यांनी केली होती. ‘जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते तेव्हा लोकांना हे वाटत असतं की त्यांना तुमच्याविषयी सगळी माहिती आहे. तुमचं चारित्र्य कसं आहे, तुमचं आयुष्य कसं आहे हे आम्हाला माहीत आहे असं लोकांना वाटतं. त्यामुळेच लोक गॉसिप करतात. मला हिंदी सिनेसृष्टीत ५० वर्षे झाली आहेत. या ५० वर्षांमध्ये मी स्वतःविषयी इतक्या खोट्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या आहेत की त्यावर एक पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. लोकांनी माझ्याविषयी अनेक अफवा पसरवल्या आहेत. अशावेळी मला माझी इमेज सुधारण्याची काहीही गरज वाटत नाही. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे विचार करु शकता.’ या आशयाची एक पोस्ट झीनत अमान यांनी केली होती.
झीनत अमान अमिताभ बच्चन यांच्यामुळे ढसाढसा रडल्या होत्या
झीनत अमान यांनी अमिताभ यांच्या वाढदिवशी एक पोस्ट केली होती त्याचीही चर्चा झाली होती. त्यांनी लिहिलं होतं की, “अमिताभ बच्चन हे कधीही सेटवर उशिरा येत नसत. मात्र एकदा सकाळच्या शिफ्टसाठी अमिताभ बच्चन यांना थोडा उशीर झाला. मी तेव्हा वेळेवर पोहचले होते. मात्र अमिताभ बच्चन ४५ मिनिटं उशिरा आले थेट सेटवर पोहचले. मला हे कळलं तेव्हा मी पण सेटवर गेले. मात्र दिग्दर्शकाला वाटलं माझ्यामुळे उशीर झाला आहे. त्यांनी काहीही न विचारता मला ओरडण्यास सुरुवात केली. मला इतकं रडू येत होतं की मी सेट सोडून गेले” अशी आठवण झीनत अमान यांनी लिहिली होती. एवढंच नाही झीनत म्हणाल्या की यानंतर अमिताभ बच्चन हे त्या दिग्दर्शकांना घेऊन माझ्याकडे आले. दिग्दर्शकांनाही त्यांची चूक समजली. झीनत अमान यांच्याकडे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ज्यानंतर झीनत अमान यांनी सिनेमा पूर्ण केला मात्र परत कधीही त्या दिग्दर्शकाबरोबर काम केलं नाही.
व्यक्तीगत आयुष्यात अफेअर आणि वादांची चर्चा
झीनत अमान यांचं व्यक्तीगत आयुष्य काहीसं वादळी ठरलं. लग्न झालेल्या संजय खान यांच्या प्रेमात झीनत अमान पडल्या होत्या असं सांगितलं जातं. संजय खान यांना चार मुलं होती. तरीही ते झीनत यांच्या प्रेमात पडले होते. असंही सांगितलं जातं की १९७८ मध्ये झीनत अमान आणि संजय खान यांनी गुपचूप लग्नही केलं होतं. मात्र संजय खान आणि झीनत यांच्यात खटके उडू लागले. एकदा तर झीनतला संजय खानने मारहाण केली होती ज्यामुळे त्यांचा एक डोळा कमकुवत झाला होता. या घटनेनंतर संजय खानपासून झीनत विभक्त झाल्या.
संजय खानपासून विभक्त झाल्यानंतर झीनत यांच्या आयुष्यात आले मझहर खान. काही काळ हे दोघे एकमेकांना डेट करत होते. १९८५ मध्ये मझहर खान आणि झीनत अमान यांनी लग्न केलं. मझहर खानही झीनत अमान यांच्यावर हात उचलायचे, त्यांना मारहाण करायचे. झीनत अमान यांनी ठरवलं की आपण मझहर खान यांच्यापासून विभक्त व्हायचं. १९९८ मध्ये मझहर खान यांचं निधन झालं. माझ्या आयुष्यात लग्नाचं सुख लिहिलंच नव्हतं असं मला वाटलं असंही त्या म्हणाल्या होत्या. अझान आणि जहान अशी दोन मुलं झीनत अमान यांना आहेत. मझहर खान यांच्या बरोबर त्या नाईलाजाने राहात होते. झीनत अमान यांचं व्यक्तीगत आयुष्य फार चांगलं नव्हतं. मी चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या पण मला खऱ्या आयुष्यात वागताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला असंही त्या म्हणाल्या होत्या. झीनत अमान या सध्या मुंबईत वास्तव्य करतात. पानिपत या सिनेमात त्या दिसल्या होत्या. एका बोल्ड आणि सुंदर अभिनेत्रीला जे खऱ्याखुऱ्या आयुष्यात सहन करावं लागलं ते बऱ्याच अंशी दुर्दैवी आहे असं म्हणता येईल. मात्र आता त्यांचं आयुष्य सुखात आहे, त्या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय आहेत. अशा खास अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!