झीनत अमान बॉलीवूडच्या ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ७० च्या दशकातील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. ‘हरे राम हरे कृष्णा’ या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्यांच्याबरोबर देव आनंद मुख्य भूमिकेत दिसले होते. मोठ्या पडद्यावर झीनत अमान आणि देव आनंद यांची जोडी चांगलीच गाजली. नुकत्याच एका मुलाखतीत झीनत अमान यांनी देव आनंद यांच्याबरोबर चित्रपटात काम कऱण्याबाबतचा अनुभव शेअर केला आहे.
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार झीनत अमान यांनी देव आनंद यांच्या चित्रपटाच्या सेटवर हेअर स्टायलिस्ट का नव्हते याचा खुलासा केला आहे. झीनत अमान म्हणाल्या, देव आनंद यांच्या चित्रपटात केशभूषा करणारे नव्हते; कारण हेअरस्टाईलिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे केशभूषा करायचे, पण देव आनंद यांना साधी केशभूषा हवी असायची. तसेच त्यांच्या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकही नसायचे. कारण नृत्य दिग्दर्शक काऊंटवर डान्स शिकवायचे आणि देव आनंद यांना ते नको होतं.”
झीनत यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आपल्या कारकिर्दीत झीनत यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये कामं केली. झीनत अमान यांनी १९७० मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘डॉन’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘यादों की बारात’सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.