अभिनेता मोहम्मद झीशान अय्युब आणि त्याची पत्नी व मराठी अभिनेत्री रसिका आगाशे यांनी मुंबईत आल्यानंतर कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. दोघांनी २४ व्या वर्षी आंतरधर्मीय लग्न केलं होतं आणि अवघे ४० हजार रुपये घेऊन त्यांनी मुंबई गाठली होती. ते पैसे दुसऱ्याच दिवशी संपले आणि तिथून खरा संघर्ष सुरू झाला होता, असं ते म्हणाले. यावेळी रसिकाने दोघांच्या वेगळ्या धर्मामुळे आलेल्या अनुभवांबद्दलही सांगितलं.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रसिका म्हणाली की तिला तिच्या पतीपेक्षा बोलण्याचे अधिक स्वातंत्र्य आहे. एक आंतर धर्मीय जोडपं म्हणून तिने काही वर्षांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. हिंदू व मुस्लीम धर्मावरील एका ब्रँडच्या जाहिरातीला विरोध झाल्यानंतर ती हटवण्यात आली होती. तेव्हा रसिकाने ट्वीट केलं होतं. त्याबद्दल ती म्हणाली, “मी ते ट्वीट केले होते, पण नंतर त्याबद्दल फारसा विचार केला नाही, तेव्हा सोशल मीडिया माझ्यासाठी नवीन गोष्ट होती. काही वेळाने झीशानने मला विचारलं की मी काय केलंय. माझ्या फोनची बॅटरी संपली होती, त्याने मला फोन चार्ज करून सोशल मीडियावर सुरू असलेलं ट्रोलिंग पाहण्यास सांगितलं. तेव्हा ‘अच्छा यालाच ट्रोलिंग म्हणतात का’, अशी माझी प्रतिक्रिया होती.”
ती पुढे म्हणाली, “मी त्याला नेहमी सांगते की, मी या देशातील बहुसंख्य लोकांचा एक भाग आहे. त्यामुळे जास्त विचार न करता मी बऱ्याच गोष्टी करते. माझी अशी इच्छा आहे की त्यालाही फार विचार न करता माझ्याप्रमाणेच त्या गोष्टी करता यायला हव्या. बहुमताचा एक भाग असल्याने, अल्पसंख्याकांना प्रत्येक गोष्टीचा इतक्या काळजीपूर्वक विचार करावा लागतो याचं मला वाईट वाटते. माझे नाव रसिका आगाशे आहे, लोक मला ट्रोल करण्यापूर्वी दोनदा विचार करतील. अल्पसंख्याकांनाही असंच वाटायला हवं. मला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. मी त्याच्याशी लग्न केल्यानंतर झीशान हा अल्पसंख्याकांचा भाग असल्याचं मला जाणवलं. बहुसंख्य म्हणून आपण अशा अनेक गोष्टींपासून अनभिज्ञ आहोत,” असंही रसिकाने नमूद केलं.
दरम्यान, रसिका आगाशे ही पुण्याची आहे. ती मराठी अभिनेत्री आहे, तिने आतापर्यंत अनेक मालिका व नाटकांमध्ये काम केलंय. तिची व झीशानची भेट दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये झाली होती. तिथे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला आता १६ वर्षे झाली आहेत. झीशान व रसिकाने नुकतंच नेटफ्लिक्समधील ‘स्कूप’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलं होतं.