नायिकेचा ‘पदर ढळण्या’पासून बिकिनी, अर्धवस्त्रे या मार्गाने जवळपास विवस्त्रावस्थेतील वावर बघण्याची आपल्याला आता सवय झाली आहे. पण विवस्त्रावस्थेतील नायक पाहण्याची ‘सवय’ अजून आपल्या डोळ्यांना झालेली नाही. त्यामुळेच ‘पीके’ या आगामी चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी अवघ्या ट्रान्झिस्टरच्या साहाय्याने आपली ‘लाज’ सावरणारा आमिरखान बघितल्यावर जरासा धक्का बसला. पण असा जवळपास विवस्त्रावस्थेत प्रेक्षकांना सामोरा जाणारा आमिर काही पहिलाच नायक नव्हे. आजच्या पिढीला माहीत असलेल्या आणखी किमान पाच नरपुंगवांनी आपले ‘अवघे शरीरसौष्ठव’ प्रेक्षकांसमोर उघडे केले आहे. ‘खानावळी’तील सगळ्यात ‘दादा खान’ शाहरूखचाही त्यामध्ये समावेश आहे. तर नायिकांचे सौष्ठव सांगोपांग दाखवणाऱ्या राज कपूर यांचा पोता अर्थात रणबीरसुद्धा या वर्गवारीत विशेषत्वाने झळकतो आहे. त्याशिवाय जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश तसेच राजकुमार राव यांनीही आपली विवस्त्र दृश्ये दिली आहेत. झालेच तर ‘बुजुर्ग’ कलाकार गिरीश कर्नाड यांनीही ‘उंबरठा’मध्ये अशीच ‘मर्यादा सोडली’ होती!
फोटो गॅलरीः नग्न दृश्ये देणारे बॉलीवूड अभिनेता
शाहरूख खान यानेही काही वर्षांपूर्वी नग्नदृश्य दिले होते. ‘माया मेमसाब’मध्ये दीपा साहीबरोबरच्या या ‘न्यूड’ सीनची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. रणबीर कपूरने तर आपल्या पदार्पणाच्याच ‘सावरिया’मध्ये असे दृश्य देऊन खळबळ उडवून दिली होती. चित्रपटात रणबीर कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळून उघडय़ा अंगाने दाखविला होता. एका बेसावध क्षणी तो टॉवेल निसटतो, असे दृश्य त्याने दिले होते. एखाद्याने पहिल्याच चित्रपटात असे दृश्य द्यावे का अशीही चर्चा त्या वेळी झाली होती. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेल’मध्ये नील नितीन मुकेशने ‘भूमिकेची गरज’ म्हणून नग्नदृश्य दिले होते. तर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘शाहीद’मध्ये राजकुमार राव यानेही नग्नदृश्य दिले होते. बॉलीवूडमधील ‘किसिंग’ मास्टर जॉन अब्राहम याने ‘न्यूयॉर्क’ आणि ‘दोस्ताना’ या दोन चित्रपटांत तशी दृश्ये दिली आहेत.
आमिर खानसारख्या समंजस म्हटल्या जाणाऱ्याने असे उघडेवाघडे सगळ्यांसमोर जाण्यामुळे सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. ‘भूमिकेची गरज’ या सबबीखाली त्याचे समर्थनही केले जात आहे. मात्र या सबबीपेक्षाही चित्रपटाची येनकेनप्रकारेण प्रसिद्धी करणे हेच अशा दृश्यांमागचे खरे कारण आहे. अशा दृश्यांमुळे तो अभिनेता आणि चित्रपट दोघांनाही प्रसिद्धी मिळते, हे विसरून चालणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा