काळानुरूप चित्रपटाच्या प्रसिद्धीतही बदल होत गेले. चाहत्यांसाठी स्वप्नवत दुनियेत राहणारे बॉलिवूडचे तारे चाहत्यांमध्ये मिसळून आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करताना दिसू लागले. हल्ली चित्रपटावर आधारित एखाद्या व्हिडिओ गेमची निर्मिती करून, अथवा चित्रपटाच्या पोस्टर अनाववरण कार्यक्रमास चाहात्याला निमंत्रित करून चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात येताना दिसते. अशाप्रकारच्या अनेक अनोख्या कल्पना चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राबविल्या जाताना दिसतात, आजच्या माहितीजालाच्या युगात तर यात झपाट्याने बदल होत आहे. काही क्षणात अनेक चाहत्यांपर्यंत पोहोचण्याच्या सामर्थ्यामुळे अनेक चित्रपटकर्ते आणि सिनेकलाकार टि्वटर किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईटवर सतत कार्यरत असलेले अढळून येतात. आता चित्रपट कलाकारांनी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडिया साईटवर आपल्या नावात बदल करण्याचा मार्ग अवलंबविला आहे. टि्वटरसारख्या सोशल मीडियासाईटवर कलाकार आपले चित्रपटातील नाव धारण करून, चित्रपटात साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे छायाचित्र प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवत आहेत. अशाप्रकारे ते चित्रपटात साकारत असलेल्या स्वत:च्या भूमिकेविषयी चाहत्यांना अवगत करताना दिसून येतात.
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान, अभिषेक बच्चन, सोनू सुद आणि दीपिका पदुकोण या स्टारमंडळीनी टि्वटरवर आपल्या खऱ्या नावाऐवजी ‘हॅपी न्यू इयर’ या आगामी चित्रपटातील चार्ली, नंदू, जग आणि मोहिनी अशी चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे धारण केली आहेत.
याचधर्तीवर ‘चिंग नुडल्स’ची जाहिरात करणाऱ्या रणवीर सिंगने ‘चिंग नुडल्स’च्या प्रसिद्धीसाठी ‘रणवीर चिंग’ असे स्वत:चे नामकरण केले आहे.
तर, शाहिद कपूरने sHAhID kapooR असे नाव लिहून HAIDR ही अक्षरे कॅपिटल लेटरमध्ये ठेवून याच नावाच्या आगामी चित्रपटातील आपले नाव साकारले आहे.
फक्त कलाकारच नव्हेत, तर दिग्दर्शक आणि निर्मातेदेखील याच मार्गाने आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करीत आहेत. फराह खानने आपल्या टि्वटर खात्यावर ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटासाठी स्वत:चे नाव Director HNY असे ठेवले आहे.
याआधी वरुण धवन, अलिया भट, सिध्दार्थ मल्होत्रा, रितेश देशमुखसारख्या कलाकारांनीदेखील अशाप्रकारे चित्रपटाची प्रसिद्धी करण्याचा अनोखा मार्ग चोखाळला होता. वरुण धवनने ‘मै तेरा हिरो’ चित्रपटासाठी ‘वरुण शिनू धवन’ आणि ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटासाठी ‘वरुण हम्पटी धवन’ असे नाव धारण केले होते. तर ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ याच चित्रपटासाठी अलिया भटने स्वत:चे नाव ‘दुल्हनिया’ असे ठेवले होते. ‘एक व्हिलन’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्राने टि्वटरवरील त्यांच्या नावात ‘व्हिलन’ या शब्दाची भर घातली होती.