मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणजे सुधीर जोशी. ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातली त्यांची भूमिका, डायलॉग आजही सोशल मीडियावर मीम बनवून शेअर केले जातात. सुधीर जोशी यांच्या मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील भूमिका विशेष गाजल्या होत्या. फार कमी लोकांना माहित आहे की सुधीर जोशी हे इंग्रजी नाटकांमध्ये देखील प्रचंड लोकप्रिय होते. सुधीर जोशी आणि बोमन इराणी यांच्या ‘आय अॅम नॉट बाजीराव’ या नाटकाची आजही चर्चा केली जाते. नुकताच बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी एका युट्युब लाइव्ह शो दरम्यान सुधीर जोशी यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. सुधीर जोशी यांनी बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांना त्यांचा मुलगा मानला होता. खुद्द बोमन इराणी यांनी सौरव पंतशी गप्पा मारताना याचा खुलासा केला आहे.
सुधीर जोशी आणि बोमन इराणी यांनी ‘आय अॅम नॉट बाजीराव’ या इंग्रजी नाटकामध्ये एकत्र काम केले होते. तेव्हा सुधीर जोशी यांच्यासोबत नाटकात काम करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न सौरवने बोमन इराणी यांना विचारला होता. ‘सुधीर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा एखाद्या कॉलेजला जाण्यासारखा होता. त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींकडून दररोज काही तरी शिकत असतो पण सुधीर जोशी यांनी मला खूप काही शिकवले’ असे बोमन इराणी म्हणाले.
पुढे ते म्हणाले ‘मराठी नाटकांमध्ये खूप ताकद आहे. माझ्या घराच्या शेजारी शिवाजी नाट्यमंदीर हे नाट्यगृह आहे. लोकं तिकडे नाटकं पाहायला येतात. जर त्यांना नाटक आवडले तर टाळ्यांचा वर्षाव करतात आणि जर नाटक नाही आवडले तर टाळ्याही न वाजवत निघून जातात. सुधीर जोशी हे मला भेटण्यापूर्वी त्यांनी नाटकांचे अनेक प्रयोग केले होते. मी नवखा होतो पण तरीही त्यांनी मला सांभाळून घेतले. आमच्यामध्ये घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. ते काय विचार करायचे हे मला माहिती असायचे आणि मी काय विचार करतो हे देखील त्यांना माहिती असायचे.’
‘सुधीर जोशींचे माझ्यावर आणि माझी पत्नी झेनोबियावर प्रचंड प्रेम होते. एकदा त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यांना मुलं नव्हतं म्हणून त्यांनी मला विचारले होतो की तू पूजेला बसशील का? मी होकार दिला. त्यानंतर मी धोतर नेसले, माझ्या पत्नीने नऊवारी साडी नेसली आणि आम्ही पूजेला बसलो. त्यांनी आम्हाला त्यांच्या मुलाप्रमाणे वागणुक दिली. आम्हाला त्यांच्या कुटूंबाचा एक भाग बनवला. हे पाहुन त्यावेळी मला खूप आनंद झाला होता’ असे बोमन इराणी पुढे म्हणाले.