धारावीच्या झोपडपट्टीतील माणसांचे भीषण जगणे चित्रित करणाऱ्या ‘बॉम्बे- १७’ या अद्वैत थिएटर्स निर्मित व संभाजी भगतलिखित नाटकातील मूळ आशयाचाच गळा घोटण्याचा प्रयत्न त्यात २३ कट्स सुचवून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने केला होता. खरे तर याआधी ‘अडगळ’ या नावाने हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर कुठल्याही काटछाटीविना सादर करण्यास सेन्सॉर बोर्डाने संमती दिली होती. परंतु व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्याकरता परवानगीसाठी ते पुन्हा सेन्सॉर बोर्डाकडे गेले असता त्यात प्रचंड काटछाट व बदल सुचवून सेन्सॉरने नाटकास परवानगी देण्यास नकार दिला. सेन्सॉर बोर्डाच्या या हडेलहप्पी कारभाराविरोधात नाटय़सृष्टी तसेच प्रसारमाध्यमांतून जोरदार टीका झाल्यावर सेन्सॉर बोर्डाने नाटकास दोन प्रयोगांपुरती परवानगी दिली. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांकरवी प्रयोग पाहून पुढील प्रयोगांची परवानगी दिली जाईल असे निर्मात्यांना सांगण्यात आले. त्यानुसार सेन्सॉरच्या सदस्यांनी ‘बॉम्बे- १७’चा प्रयोग पाहिल्यावर सेन्सॉर बोर्डाने निर्माते राहुल भंडारे आणि लेखक संभाजी भगत यांना काल चर्चेसाठी पाचारण केले होते. या बैठकीत सेन्सॉर बोर्डाने आपली चूक मान्य करून काही किरकोळ बदल सुचवत नाटकाला पुढील तीन महिन्यांसाठी प्रयोग परवानगी दिली आहे आणि सध्यातरी पॅरोलवर सुटका केली आहे. वादग्रस्त नाटकाला तांत्रिक कारणास्तव तीन महिन्यांचीच परवानगी दिली जाते, त्यानंतर फेरआढावा घेऊन कायमस्वरूपी परवाना दिला जातो, असे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष राम जाधव यांनी यावेळी निर्माते राहुल भंडारे यांना सांगितले.    

Story img Loader