धनादेश न वटल्याप्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी हजर राहण्याचे आदेश वारंवार देऊनही हजर न राहणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याविरुद्ध अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी बजावलेले अजामीनपात्र अटक वॉरंट मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केले. विशेष म्हणजे न्यायालयाने महानगरदंडाधिकाऱ्यांच्या कृतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत पांडित्याचा स्तोम माजविण्याच्या वृत्तीतून हे वॉरंट बजावण्यात आल्याचे ताशेरेही ओढले.
महानगरदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटविरोधात प्रीतीने मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानेतेव्हा या कारवाईला स्थगिती दिली होती. गुरुवारी न्यायमूर्ती साधना जाधव यांनी प्रीतीविरुद्ध काढलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केले.
दरम्यान, महानगरदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणाची सुनावणी तीन किंवा चार आठवडय़ांनी ठेवली आणि प्रीतीने सुनावणीला हजर राहावेच लागेल असे बजावले. दुसरीकडे अन्य प्रकरणांची सुनावणी मात्र न्यायालयाने तीन ते सहा महिन्यांनी ठेवली, ही बाब प्रीतीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेत या प्रकरणात केवळ ‘सेलिब्रेटी’चा समावेश असल्याने महानगरदंडाधिकारी हे प्रकरण विशेष प्रकरण म्हणून हाताळत असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. तसेच प्रीतीच्या अर्जावर काहीच निर्णय न देत ते प्रलंबित ठेवण्याच्या महानगरदंडाधिकाऱ्यांच्या कृतीबाबतही न्यायालयाने ताशेरे ओढले. तसेच प्रीतीच्या अर्जाची सुनावणी घेण्याचे आणि त्यावर निर्णय देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
‘इश्क इन पॅरिस’ या चित्रपटाचे पटकथा लेखक अब्बास टायरवाला यांनी प्रीतीविरुद्ध १८.९ लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी अंधेरी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. त्या विरोधात प्रीतीने उच्च न्यायालयात धाव घेत महानगरदंडाधिकाऱ्यांसमोरील तक्रारीच्या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती. मात्र प्रीतीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिले होते.
अभिनेत्री प्रीती झिंटाला उच्च न्यायालयाचा दिलासा
धनादेश न वटल्याप्रकरणी साक्ष नोंदविण्यासाठी हजर राहण्याचे आदेश वारंवार देऊनही हजर न राहणारी अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्याविरुद्ध अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते.
First published on: 01-01-2014 at 12:50 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court relief to preeti zinta