सलमान खानविरुद्धच्या खटल्याशी संबंधित वृत्तांकन करण्यास उच्च न्यायालयाने काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना मज्जाव केला आहे.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरुद्ध सुरू असलेल्या फेरखटल्याशी संबंधित वृत्तांकन करण्यास उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने काही वृत्तवाहिन्यांसह वृत्तपत्रांना मज्जाव केला आहे. इंटरनेवरूनही खटल्याशी संबंधित मजकूर प्रसिद्ध करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.
नाटय़ रुपांतरणाद्वारे खटल्याच्या कामकाजाचे वृत्तवाहिन्या वृत्तांकन करीत असल्याचे आणि त्याद्वारे आपली बदनामी करीत असल्याचा आरोप सलमानने याचिकेद्वारे केला आहे. त्याच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती सुरेश गुप्ते यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने हे आदेश दिले.
गेल्या २१ मे रोजी झालेल्या खटल्याच्या कामकाजाबाबतच्या वृत्तवाहिन्यांनी केलेल्या वृत्तांकनाची चित्रफितही सलमानच्या वतीने आपला दावा सिद्ध करण्यासाठी न्यायालयात सादर करण्यात आली. सलमानने या वृत्तवाहिन्यांविरुद्ध बदनामीचा दावा दाखल करताना बदनामी करणारे वृत्तांकन दाखविण्यास मनाई करण्याची मागणी केली.
बऱ्याचदा नोटिसा देऊनही एकाही वृत्तवाहिनीने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. शिवाय सलमानच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळेसही त्यांच्यातर्फे वकील न्यायालयात हजर नव्हते, असे सलमानच्या वकिलांतर्फे सांगण्यात आले. त्यावर अंतरिम दिलासा देण्याबाबतच्या निर्णयासाठी न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २ जून रोजी ठेवली आहे.