सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडथळे काही केल्या कमी होत नाही आहेत. ‘केदारनाथ’ चित्रपटाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या चित्रपटावर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सारा अली खान व सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका असलेला ‘केदारनाथ’ हा चित्रपट ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात केदारनाथ या हिंदू धर्मीयांच्या पवित्र ठिकाणी नायक- नायिकेचा किसिंग सीन दाखवण्यात आला असून त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केली आहे. जोपर्यंत सेन्सॉर बोर्ड पुन्हा एकदा हा चित्रपट पाहून त्यातील आक्षेपार्ह दृश्यावर कात्री लावण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

वाचा : शूटिंगदरम्यान देवदत्त नागेच्या पायाला दुखापत 

२०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा संदर्भ या चित्रपटाला देण्यात आला आहे. चित्रपटाविरोधात याआधी रुद्रप्रयागच्या जिल्हा मुख्यालयासमोर काही लोकांनी निदर्शनेही केली होती. ‘केदारनाथ’चा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासून या विरोधाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते अजेंद्र अजय यांनीही ट्विट करत या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना चित्रपटावर बंदी आणण्याची विनंती त्यांनी या ट्विटद्वारे केली होती.

अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटाच्या वाटेत आधीही बऱ्याच अडचणी आल्या होत्या. आता ‘केदारनाथ’च्या प्रदर्शनाची वाट मोकळी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court to hear a plea against sara ali khan movie kedarnath tomorrow