रेश्मा राईकवार
हिंदी-मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन, अभिनय, बिग बॉससारख्या शोचे सूत्रसंचालन, वेब मालिकांची निर्मिती, नाटकाची निर्मिती अशा सगळय़ाच माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेलं मराठीतलं एक नाव म्हणजे महेश मांजरेकर. ‘एका काळेचे मणी’ या जिओ सिनेमावरील वेब मालिकेचे निर्माते म्हणून ते सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आले आहेत. चित्रपटांचं कामही एकीकडे सुरूच आहे. आता मुंबई शहराची गोष्ट नव्या माध्यमातून सांगण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठी अभ्यास-संशोधन सुरू असल्याची माहिती महेश मांजरेकर यांनी दिली.
मुंबईचा इतिहास, मुंबई आधी काय होती आणि आता काय आहे? मुंबईचं राजकारण, चित्रपट, खेळ हे सगळं वेगळय़ा पद्धतीने मांडण्यासाठी अभ्यास सुरू आहे. थोडक्यात ‘बॉम्बे ते मुंबई’ हा प्रवास मला मांडायचा आहे, असं सांगतानाच सतत काम करत राहिल्यानेच आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे यापुढेही प्रत्येक माध्यमातून काम करत राहणार असं ते ठामपणे सांगतात. ‘एका काळेचे मणी’ या वेब मालिकेची निर्मिती त्यांनी केली असली तरी याचं एकूणच श्रेय ऋषी मनोहर, ऋतुराज शिंदे आणि ओम भूतकर या तीन तरुणांचं आहे असं ते सांगतात. ‘ओमने या वेब मालिकेचं लिखाण केलं आहे. एका कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या विनोदी घटना.. असं स्वरूप आमच्या डोक्यात होतं. आम्हाला कुठलाही फार्स करायचा नव्हता. काळे नावाच्या कुटुंबात घडणारी गोष्ट म्हणून ‘एका काळेचे मणी’. या वेब मालिकेच्या एकूणच संकल्पनेपासूनच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग अधिक होता हे मला फार महत्त्वाचं वाटलं. संपूर्ण कुटुंब घरात बसून पाहू शकेल अशी वेब मालिका मला करायची होती आणि या तिघांनी ती कल्पना तंतोतंत अमलात आणली’ अशा शब्दांत त्यांनी या तरुण तुर्काचं कौतुक केलं.
प्रशांत दामलेंच्या येण्यानं मालिकेत बहार आली. प्रशांतच्या नाटकातील विनोदही प्रासंगिक असतो, त्याच प्रासंगिक विनोद स्वरूपातील ही मालिका आहे. त्याच्याबरोबर समीर चौगुले, विशाखा सुभेदार, ह्रता दुर्गुळे, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर अशा खूप चांगल्या कलाकारांचा चमू या वेब मालिकेच्या निमित्ताने एकत्र आला आहे, असं मांजरेकर यांनी सांगितलं. प्रशांत दामले हे यशस्वी अभिनेते-निर्माते आहेत हे लोकांना दिसतं, मात्र त्यासाठी त्यांनी तितकाच त्यागही केला आहे. वेब मालिकेत खूप पैसे मिळतात, चित्रपटात खूप पैसे मिळतात हे माहिती असूनही प्रशांत दामले यांनी नाटक सोडलं नाही. त्याचा रंगभूमीवरचा जो विश्वास आहे तो खूप जबरदस्त आहे, असं मांजरेकर यांनी सांगितलं.
‘प्रेक्षक येत नाहीत ही ओरड व्यर्थ’
मराठी चित्रपटांची स्थिती सध्या अजिबातच चांगली नाही. कन्नड चित्रपटसृष्टीही तितकी लोकप्रिय नव्हती, पण त्यांनी काहीएक धाडस केलं. त्यांनी ‘केजीएफ’ केला, तो चालल्यानंतर ‘केजीएफ २’, ‘कंतारा’ केला. आता त्या चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे अचानक त्यांचा निर्मितीखर्च वाढला, चित्रपटाची गुणवत्ता वाढली. मराठी चित्रपट हे आशयाच्या बाबतीत कमी नाहीत, पण गुणवत्तेचं काय? शंभर कोटी आणि त्याहून अधिक असलेल्या चित्रपटांपुढे तुलनेने मराठी चित्रपट बराच फिका पडतो. त्यासाठी मी प्रेक्षकांना दोष देणार नाही. तुम्ही चांगला चित्रपट दिला तर प्रेक्षक तुमच्यापर्यंत येणारच. कारण मराठी चित्रपटाचं तिकीट हे किती दीडशे-दोनशे रुपये असतं. तिथे न फिरकणारा प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी मात्र पाचशे रुपये तिकिटाचे खर्च करून येतो. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहायला येत नाहीत अशी तक्रार करण्यात मला काहीच अर्थ वाटत नाही.
टीकेपेक्षा कौतुकाचा आनंद घ्यावा..
‘ज्या माणसाचा आवाज त्याच्या घरचेही ऐकत नाही तोही आपल्याला समाज माध्यमांवरून शिव्या घालू शकतो. पूर्वी माध्यमंच नव्हती, आता प्रत्येकाला आपली खरी ओळख लपवून दुसऱ्याला अपशब्द बोलायचा परवानाच जणू समाजमाध्यमांमुळे मिळाला आहे’ अशा शब्दांत त्यांनी समाजमाध्यमांवरून होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी दहा लोकांपैकी दोन लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहेत. तर त्या दोन लोकांनी नावं ठेवली याचा त्रास करून घेण्यापेक्षा आठ लोकांनी आपल्या कामाचं कौतुक केलं आहे ते समजून घेऊन आनंदाने पुढे जात राहायला पाहिजे या मताचा मी आहे’ असं त्यांनी सांगितलं. ‘एका काळेचे मणी’ या वेब मालिकेची आणखी काही पर्व काढण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या पर्वात ते स्वत: एका भागात काम करणार आहेत. तर ओमकार भोजनेही दुसऱ्या पर्वात असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठीतील उत्तम आशयाला आर्थिक जोड हवी
मराठीत उत्तम आशय आहे यात वादच नाही, पण तो चांगला दिसलाही पाहिजे. मराठी चित्रपट पाहताना अनेकदा नाटक किंवा मालिका पाहिल्याचा अनुभव मला येतो. मराठीतल्या चांगल्या आशयाला हिंदीत ज्या पद्धतीचं आर्थिक भांडवल मिळतं त्याची जोड मिळाली तरी मराठी चित्रपट गुणवत्तेतही इतरांना मागे टाकेल. मराठी चित्रपटांना देशभरातील प्रेक्षकसंख्याही नको.. महाराष्ट्रातला प्रेक्षक मिळाला तरी खूप मोठं आर्थिक यश मिळवत मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांना चांगली मात देऊ शकेल. तीन कोटीचे दहा चित्रपट बनवण्यापेक्षा ३० कोटीचा एकच चांगला चित्रपट करेन, असे म्हणणारे संवेदनशील निर्माते मराठी चित्रपटांनाही मिळायला हवेत.
‘केजीएफ’, ‘कंतारा’ हिंदीत केले नाहीत..
निपुण धर्माधिकारी, समीर विद्वांस, आदित्य सरपोतदार असे तरुण दिग्दर्शक आज हिंदी चित्रपट करत आहेत, त्यामुळे आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमी नाही, असं मांजरेकर सांगतात. ‘आपले दिग्दर्शक सरस आहेत, त्यांना चांगले निर्माते मिळाले तर भविष्यात तमिळ, तेलुगू चित्रपट जसे डब करून पाहिले जातात तसे मराठी चित्रपटही पाहिले जातील. ‘कंतारा’, ‘केजीएफ’सारखे चित्रपट त्यांनी हिंदीत केले नाहीत. त्यांनी डब केलेले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला लावले. ‘केजीएफ’मधील अभिनेता यश आधी कोणाला माहिती होता, पण त्यांनी तो देशभरातील प्रेक्षकांना स्वीकारायला लावला’ अशी उदाहरणे देत मराठी चित्रपट दिग्दर्शकांकडेही आपल्या कलाकारांना, चित्रपटांना देशभरात पोहोचवण्याची ताकद आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.