अभिनेत्री श्रीदेवी हिच्याविषयीच्या भावना उघडपणे व्यक्त केल्यामुळे श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. श्रीदेवी माझे क्रश असल्याचे सांगणाऱ्या राम गोपाल वर्मांना बोनी कपूर यांनी वेडा आणि विकृत असे संबोधले आहे.
काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मा यांचे ‘गन्स अँड थाईस’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. या आत्मचरित्रात वर्मा यांनी श्रीदेवीची तुलना सौंदर्यदेवतेशी करताना श्रीदेवी ही एक परी असल्याचे सांगितले होते. तिला बोनी कपूर यांच्या स्वयंपाक घरात चहा बनवताना पाहून फार दु:ख होतं. बोनी कपूर यांनी एका परीला स्वर्गातून स्वयंपाक घरात आणलं त्यांना मी कधीच माफ करणार नाही, असे वर्मा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले होते. तसेच आपल्या आत्मचरित्रातील श्रीदेवीवरील अध्याय हे माझे प्रेमपत्र असल्याचेही राम गोपाल वर्मा यांनी सांगितले होते. याच विधानांचा समाचार घेताना बोनी कपूर यांनी रामगोपाल वर्मा हे वेडे आणि विकृत मनोवृत्तीचे असल्याचे सांगितले.
दरम्यान, या टीकेचा प्रतिवाद करताना राम गोपाल वर्मा बोनी कपूर यांना पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. बोनी कपूर यांनी माझ्याविरुद्ध गरळ ओकण्यापूर्वी माझ्या पुस्तकातील श्रीदेवीजींवर लिहलेले प्रकरण वाचावे. बोनी कपूर यांच्या मनात बायको म्हणून श्रीदेवी यांच्याविषयी जितका आदर असेल त्यापेक्षा जास्त आदर एक चाहता म्हणून माझ्या मनात असल्याचे वर्मा यांनी म्हटले.

Story img Loader