सध्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबत सुरु असलेला वाद अजूनही संपला नाही. अभिनेता किच्चा सुदीपने हिंदी भाषेबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर अजय देवगणने यावर प्रतिक्रिया देत नव्या वादाला तोंड फुटलं. हा वाद संपत नाही तोपर्यंत एक नवा मुद्दा वादाचा विषय ठरला. अभिनेता महेश बाबूने “बॉलिवूडला मी परवडणार नाही” असं विधान केलं आणि बॉलिवूडकरांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. आता बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली आहे. महेश बाबूच्या या वक्तव्यावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
काय म्हणाले बोनी कपूर?
बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सध्या महेश बाबूवरून सुरु असलेल्या वादावर आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “मी यावर कोणतंच भाष्य करू इच्छित नाही. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य असे दोन्ही चित्रपट मी करतो. तमिळ, तेलुगू चित्रपटही मी केले आहेत. त्याचबरोबरीने कन्नड चित्रपटही मी करणार आहे. त्यामुळे या वक्तव्यावर बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही.”
आणखी वाचा – ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले इतके कोटी मानधन? बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांनाही टाकलं मागे
पुढे बोलताना ते म्हणाले, “बॉलिवूडला तो परवडणार नाही असं महेश बाबूला जर वाटत असेल तर ते बोलायचा त्याला अधिकार आहे. प्रत्येक माणसाला त्याची मत आहेत आणि असं बोलण्यामागे त्याची स्वतःची काही कारणं असू शकतात. त्याच्या या मतावर भाष्य करणारे आपण कोण? जर महेश बाबूला त्याने मांडलेलं मत चांगलं वाटत असेल तर त्याच्यासाठी हे चांगलंच असणार.” बोनी यांनी महेश बाबूबाबत आपलं स्पष्ट मत मांडत सध्या सुरु असलेल्या वादाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा बहुदा प्रयत्न केला आहे.
आणखी वाचा – “…तर चित्रपट किती कोटी कमावतो याला अधिक महत्त्व” प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान
दरम्यान महेश बाबूमुळे हा वाद सुरु झाला. त्यानंतर खुद्द अभिनेत्यानेच यावर स्पष्टीकरण दिलं. “मी प्रत्येक चित्रपटांवर प्रेम करतो. तसेच प्रत्येक भाषेचा सन्मान करतो. मी जिथे काम करतो तिथे मी खूश आहे. माझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होत आहे हे पाहून मी आनंदी आहे. कारण तेलुगू चित्रपट दिवसेंदिवस प्रगती करत आहेत.” पण बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी हा सुरु झालेला वाद काही लवकर संपणार नाही अशीच चिन्ह सध्या दिसत आहेत.