बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बोनी कपूरसह दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि खूशी कपूरने स्वत:ला क्वारंटाइन केले आहे.
बोनी कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. ‘आमच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तो शनिवारी संध्याकाळपासून आजारी होता. त्यामुळे आम्ही त्याला करोना चाचणी करण्यासाठी पाठवले आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले. त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे कळताच आम्ही त्याची माहिती सोसायटीमध्ये दिली’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.
‘माझी मुले आणि माझ्या घरात काम करणारे इतर कर्मचारी ठिक आहेत. आम्हाला कोणालाचा करोनाची लक्षणे जाणवत नाहीत. विषेश म्हणजे लॉकडाउनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरातच आहोत. आम्ही घराबाहेर गेलेलोच नाही. आता आम्ही सगळ्यांनी पुढचे १४ दिवस स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मेडीकल टीमने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन आम्ही करत आहोत’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीने आमच्याकडे लक्ष दिले त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. मला विश्वास आहे सर्वकाही लवकरच ठिक होईल असे बोनी कपूर यांनी पुढे म्हटले आहे.