‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. चित्रपटासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. तिकीटविक्रीच्या बाबतीतही हा चित्रपट बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयकॉटची मागणी होत आहे. नुकतंच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे उज्जैन येथे महाकालेश्वराचं दर्शन घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांची अडवणूक करण्यात आली आणि त्यांना दर्शन घेण्यापासून रोखण्यात आलं. सोशल मीडियावर याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती.
या प्रकरणाबाबत दोन्ही बाजूनी चर्चा होत होत्या. काही लोकांनी आलिया रणबीरला दर्शन घेण्यास मनाई केली गेली हे सांगितलं तर उज्जैन इथल्या अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती पुढे केली. त्यांच्या स्पष्टीकरणानुसार, मंदिराबाहेर काही लोकांनी निदर्शनं करायला सुरुवात केली होती, पण तिथल्या व्यवस्थापकांनी सुरक्षेची उत्तम सोय केली होती. शिवाय त्यांनी रणबीर आणि आलिया यांना दर्शनासाठी येण्याची विनंतीदेखील केली होती. पण दोन्ही कलाकारांनी तिथे जाण्यासाठी नकार दिला. आलिया आणि रणबीर सोडल्यास इतर कलाकारांनी महाकालेश्वराचं दर्शन घेतलं होतं.
याच संदर्भात दिग्दर्शक अयान मुखर्जीने एका पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे आणि झाल्याप्रकाराबाबत खेद व्यक्त केला आहे. अयान म्हणतो, “आलिया आणि रणबीर हे दोघेही महाकालेश्वराचं दर्शन घ्यायला आले नाहीत याचं मला वाईट वाटतं. मी या चित्रपटाच्या पोस्टरच्या रिलीजदरम्यान इथे आलो होतो. आणि चित्रपट प्रदर्शनाच्या आधी पुन्हा इथे यायचं मी ठरवलं होतं. दोघांनाही तिथे दर्शनाला येण्याची खूप इच्छा होती. पण जेव्हा तिथे निदर्शनं सुरू असल्याची बातमी समजली तेव्हा त्यांनी दर्शनाला यायचं रद्द केलं. आलियाला सध्याच्या अवस्थेत तिथे नेण्याचा धोका पत्करायला मीदेखील तयार नव्हतो.”
आणखी वाचा : “ब्रह्मास्त्रचं नाव बदलून…” कॉमेडीयन अतुल खत्री यांची ट्विटरवरची ‘ती’ खोचक कमेंट व्हायरल
याबरोबरच अयानने बॉयकॉट ट्रेंडबद्दलसुद्धा त्याचं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, “ब्रह्मास्त्रसारख्या चित्रपटातून केवळ सकारात्मक वातावरण निर्माण करायचा आमचा हेतु आहे. सध्या साऱ्या जगाला त्याचीच आवश्यकता आहे. या चित्रपटात भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं आणि जी व्यक्ति हा चित्रपट बघेल ती नक्कीच एक सकारात्मक विचार घेऊन बाहेर पडेल.” ९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट साऱ्या देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट, मौनी रॉय, अमिताभ बच्चनसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.