सध्या सगळीकडेच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आता फक्त ३ दिवस बाकी असून चित्रपटातले कलाकार आणि इतर मंडळी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. बॉयकॉट ट्रेंडमुळे बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत आहे. बॉलिवूडमधला सर्वात महागडा चित्रपट म्हणून याकडे बघितलं जात आहे. मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट दणकून आपटल्याने एकूणच चित्रपटगृहाच्या मालकांना, निर्मात्यांना याच चित्रपटाकडून अपेक्षा आहेत.

दाक्षिणात्य कलाकारसुद्धा या चित्रपटाला पाठिंबा देताना दिसत आहेत. बाहुबलीसारखा चित्रपट देणारे राजामौलीसुद्धा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मैदानात उतरले आहेत. नुकताच हैदराबाद इथल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये ‘ब्रह्मास्त्र’चा खास शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राजामौली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. पण हा कार्यकर्म पोलिसांनी रद्द केल्याने ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमला दीड कोटीचं नुकसान झालं आहे.

रामोजी फिल्मसिटीमध्ये या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू होती. यासाठी ब्रह्मास्त्रची सगळी कलाकार मंडळी हैदराबादमध्ये आली होती. मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे याची चर्चा होती. पण अपेक्षेपेक्षा जास्त लोकं आल्याने हा कार्यक्रम हैदराबाद पोलिसांनी रद्द केला आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमने केवळ १० ते १२ हजार लोकांचा अंदाज घेऊन कार्यक्रम ठरवला होता. पण ज्युनिअर एनटीआर आणि राजामौली यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली आणि तब्बल ३० हजार प्रेक्षक त्याठिकाणी गोळा झाले.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पोलिसांकडे एवढी मोठी गर्दी सांभाळण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नव्हतं. आणि दक्षिण भारतात स्टार्सचे चाहते मर्यादा ओलांडून वागतात त्यामुळे पुरेशी सुरक्षा नसल्या कारणाने हैदराबाद पोलिसांनी ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करायचा निर्णय घेतला. हा कार्यक्रम रामोजी फिल्म सिटी ऐवजी हैदराबाद इथल्या एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राजामौली यांनी याविषयी स्पष्टीकरण दिलं.

आणखी वाचा : “तो अगदी त्याच्या वडीलांसारखा…” अभिनेत्री करीना कपूरने लाडक्या तैमुरबद्दल शेअर केली खास गोष्ट

अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट, मौनी रॉय अभिनीत ‘ब्रह्मास्त्र’ ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं अडवांस बुकिंग सुरू झालं असून आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी या तिकीट बुक केलं आहे. त्यामुळे लोकं या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं स्पष्ट होत आहे.