आपण आपल्या एखाद्या आवडीच्या हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि तिथे आपल्याला आवडणारा नेहमीचा पदार्थ मागवतो, पण नेमका त्या दिवशी आचाऱ्याकडून तो पदार्थ पुरता फसलेला असतो. असा अनुभव आपल्याला बऱ्याचदा येतो, तसाच काहीसा अनुभव ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा’ हा बहुचर्चित चित्रपट बघताना आला. अर्थात हे थोडक्यात चित्रपटाचं निरीक्षण आहे. सर्वांगाने बघायला गेलं तर जितकं याविषयी नकारात्मक लिहिलं किंवा बोललं गेलं आहे तितका हा चित्रपट नक्कीच नकारात्मक नाही. तब्बल ४०० कोटींपेक्षा जास्त बजेट आणि ८ वर्षांहून अधिक काळ घेऊन दिग्दर्शक अयान मुखर्जी याने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला खरा. पण एकूण चित्रपट बघताना आपल्याला त्या हॉटेलमधल्या फसलेल्या पदार्थाची सतत आठवण येत राहते कारण अयानकडून बऱ्याच लोकांना अपेक्षा होत्या.

अयानचे दिग्दर्शक म्हणून आजवर दोनच चित्रपट आले असले तरी तो अत्यंत हुशार दिग्दर्शक आहे हे त्याच्या आधीच्या चित्रपटावरून समजतं. पण ‘ब्रह्मास्त्र’सारख्या खूप मोठा अवाका असणाऱ्या विषयाला हात घालण्यासाठी जो आत्मविश्वास आणि परिपक्वता एका दिग्दर्शकाकडे हवी त्याचा अभाव अयानच्या दिग्दर्शनात जाणवतो. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांना पहिल्या दोन दिवसात चित्रपटगृहाकडे खेचण्यात थोडाफार यशस्वी होईल पण त्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढणं निदान मला तरी कठीण वाटत आहे. यामागे प्रामुख्याने तीन कारणं आहेत, एक म्हणजे दिग्दर्शनातल्या त्रुटी, उत्तरार्धातली विस्कळीत पटकथा आणि वरवर केलेली कथेची मांडणी.

maharashtra Mahayuti Govt schemes
Financial Burden on Maharashtra: मतदारांना आकर्षित करण्यासाठी २०० घोषणा; प्रतिवर्षी १ लाख कोटींचा बोजा; निवडणुकीसाठी महायुतीकडून राज्यावर बोजा?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
vidhan sabha expenditure limit
मर्यादा चाळीस लाखांची… झाकली मूठ कैक कोटींची !
implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?
state government canceled Diwali fare hike benefiting passengers but costing corporation Rs 100 crores mnb 82 sud 02
‘एसटी’च्या भाडेवाढ रद्दमुळे १०० कोटींचा फटका, अन् कर्मचाऱ्यांची दिवाळी भेट…
how nirav modi committed fraud of rupees 11000 crores
हिरा है सदा के लिये! (पूर्वार्ध)

प्राचीन भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील वेगवेगळी अस्त्रं, त्यांची शक्ती, त्यांचा इतिहास आणि या धर्तीवर आजच्या काळात घडणाऱ्या विचित्र घडामोडी आपल्यासमोर मांडल्या आहेत. शिवा (रणबीर कपूर) आणि ईशाचं (आलिया भट्ट) वेगळं नातं, शिवाच्या भूतकाळातील काही रहस्य आणि ब्रह्मास्त्रचं महत्व हे अधोरेखित करताना चित्रपट पकड घेतो खरी पण उत्तरार्धात ती पकड पूर्णपणे सुटते.

चित्रपटाचा पूर्वार्ध हा अत्यंत उत्तमरित्या कथेची मांडणी असणारा आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा आहे. मध्यांतर झाल्यानंतर पुढे नेमकं काय होणार याची उत्सुकता आपल्याला लागते. पण जेव्हा उत्तरार्ध सुरू होतो तशी ती उत्सुकता हळूहळू कमी होऊ लागते. कसलाही ताळमेळ नसलेल्या गोष्टी आपल्यासमोर घडायला लागतात आणि चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य बाजूला ठेवून एक वेगळंच कथानक आपल्यापुढे उलगडू लागतं. यामध्ये सर्वस्वी चूक दिग्दर्शकाची नाही. उत्तरार्धात कलाकारांची कामंसुद्धा फारशी चांगली झालेली नाहीत. रणबीर आणि अमिताभ बच्चन यांच्यातलं नातं आणखीन खुलवून दाखवता आलं असतं, शिवाय मध्यंतरानंतर येणारं अमिताभ बच्चन यांचं पात्र आणि त्यामागची पार्श्वभूमी न मांडल्याने ते पात्र कोणत्याही प्रकारे प्रेक्षकांशी जोडलं जात नाही. उत्तरार्धात मौनी रॉय, आणि खासकरुन रणबीर कपूर यांच्यातले संभाषण फार बेगडी वाटते.

पूर्वार्धात कथानक आणि खासकरुन पटकथा उत्तमरीत्या बांधल्याने वेळ कसा जातो ते कळत नाही, पण उत्तरार्ध मात्र नक्कीच निराश करतो. पूर्वार्धात नागार्जुन यांचं पात्र आणि त्याच्या नंदीअस्त्राचे काही दृश्यं खूप बारकाईने चित्रित केले असल्याने ते मनावर छाप पाडून जातात. त्यामानाने इतर अस्त्र आणि त्यांची हाताळणी ही फार बालिश वाटते. एकंदर आभासी विश्व निर्माण करून त्यात या सगळया गोष्टींचं मिश्रण करून एक उत्तम संकल्पना अयानने तयार केली पण तिची हाताळणी मात्र त्याला फारशी जमलेली दिसत नाही.

चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे त्याचा पूर्वार्ध, पार्श्वसंगीत, संवाद आणि थोड्याफार प्रमाणात प्रभाव टाकणारे स्पेशल इफेक्ट्स. चित्रपटाच्या पूर्वार्धाबद्दल आपण बोललोच, पण चित्रपटाचं पार्श्वसंगीत तुमच्या मनाचा ठाव घेतं, खासकरुन अशा चित्रपटांसाठी ज्या पद्धतीचं संगीत अपेक्षित असतं अगदी तसंच यामध्ये अनुभवायला मिळतं. प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ही आधीपासूनच कित्येकांच्या ओठांवर आहेत. त्या गाण्यांचं सादरीकरणही उत्तम झालं आहे. हुसैन दलाल यांनी लिहिलेले काही संवाद नक्कीच काळजाला भिडतात, तसेच केवळ आणि केवळ पूर्वार्धात दिसणारे काही मोजके स्पेशल इफेक्ट प्रभाव पाडतात.

खरंतर या चित्रपटाकडून सर्वात जास्त ज्या गोष्टीची अपेक्षा होती तीच हा चित्रपट पूर्ण करू शकला नसल्याने निराशा झाली. उत्तरार्धातले बहुतेक सगळेच स्पेशल इफेक्ट पुरते फसले आहेत. खासकरुन क्लायमॅक्सला पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी पाहताना हसू आवरत नाही. 3D मध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला आहे पण एखाद दुसरा सिन सोडला तर बाकी ठिकाणी 3D चं कामही प्रचंड वाईट झालं आहे. शिवाय चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटाला येणारी काही एनीमेशन्स पाहताना ‘ठकठक’, ‘टारझन’, ‘मोगली’ अशा कार्टून्सची आठवण येते. हे सगळं पाहताना यावर ४०० कोटी नेमके कुठे खर्च झाले हा प्रश्न नक्की पडतो.

आणखी वाचा : “आलिया रणबीरला महाकालेश्वराचं दर्शन…” ‘ब्रह्मास्त्र’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया चर्चेत

अभिनयाच्या बाबतीत रणबीर कपूर आणि आलियाने उत्तम काम केलं आहे. रणबीरचा भूतकाळ जेव्हा त्याला सतावतो तेव्हाची त्याची एक विशिष्ट लकब पाहायला मिळते ती अत्यंत खोटी वाटते, शिवाय अशा चित्रपटांसाठी संवादांवर मजबूत पकड आवश्यक असते त्यातही रणबीरने कमी पडला आहे. त्यातुलनेत आलियाचा अभिनय फारच सहज आणि सुंदर झाला आहे, तिने तिच्याकडून १००% द्यायचा प्रयत्न केला आहे हे तिचा प्रत्येकवेळी जाणवतं. मौनी रॉयचं पात्र बघताना न राहून मार्व्हलमधल्या वांडाची आठवण येते. त्या पात्रात आणखी वेगळेपण दिग्दर्शकाला दाखवता आलं असतं. अमिताभ बच्चन यांचं पात्र बारकाईने लिहिलं गेलं नसल्याने त्यांना चित्रपटात फारसा वाव नाही. रणबीर आणि त्यांच्यातलं एखादं दृश्यं सोडला तर बाकी ठिकाणी बच्चन साहेब त्यांची छाप आपल्यावर पाडू शकत नाहीत. नागार्जुन यांचं काम अनपेक्षितपणे उत्तम झालं आहे आणि त्यांच्या पात्राला बऱ्यापैकी न्याय दिला आहे. बाकी काही आणखीन अनपेक्षित गोष्टी आणि पात्रंसुद्धा आहेत पण त्यांचं चित्रपटातलं योगदान नगण्य आहे.

एकूणच ब्रह्मास्त्राची ही लढाई आणि त्यामधले वेगवेगळे कंगोरे आणखी बारकाईने उलगडता आले असते. मी आधी म्हंटलं त्याप्रमाणे आपली प्राचीन भारतीय संस्कृती आणि त्यामागचा इतिहास या विषयाचा अवाका फार मोठा आहे. निश्चित यावर एक फँटसी वर्ल्ड तयार करता येऊ शकतं. ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमने तो प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करायला हवं. पण या कथानकाला ज्या गांभीर्याने हाताळायला हवं होतं तसं न झाल्याने हा चित्रपट आणि खासकरुन याचा उत्तरार्ध हा निराशाजनक ठरतो. माझ्यामते अयानसारख्या दिग्दर्शकाकडे ती क्षमता आहे, त्याने या चित्रपटासाठी आणखीन काही वर्षं घेऊन कथेवर आणि सादरीकरणावर काम करायला काही हरकत नव्हती असं मला वाटतं. किमान याच्या पुढील भागात या सुधारणा बघायला मिळतील अशी आशा नक्कीच करू शकतो. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या जवळील चित्रपटगृहात जाऊन तुम्ही ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा’ नक्की बघू शकता.