तीन वेळा नॅशनल फिल्म अवॉर्ड जिंकणाऱ्या आणि भारतीय टीव्ही क्षेत्रातील स्टार, हिंदी सिनेमा क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं आज निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सुरवातीला बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनय दिल्यानंतर ५० वर्षांनी त्या टीव्ही क्षेत्राकडे वळल्या. त्यानंतर घराघरात त्या ‘दादी सा’ म्हणून ओळखू लागल्या. छोट्या असोत वा मोठ्या, सगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये सुरेखा सिकरी यांनी आपला ठसा उमटवला. अभिनेत्री सेरखा सिकरी यांचे पाहिलेच पाहिजेत अशा चित्रपटांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) तमस
१९८६ मध्ये रिलीज झालेला ‘तमस’ हा चित्रपट भीष्म साहनी यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. याच चित्रपटासाठी सुरेखा सिकरी यांना सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीसाठी पहिला नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता. या चित्रपटात हिंदू, मुस्लिम, सिख या स1मुदायामधील हिंसेचे तटस्थ चित्रण करण्यात आले होते. ‘तमस’ जेव्हा दूरदर्शन वरून प्रसारित झाला तेव्हा त्याविरुद्ध कोर्टामध्ये खटला सुद्धा दाखल झाला होता. सर्व समुदायामधील स्वार्थी-राजकीय प्रवृत्ती हिंसेच्या वेळी कसे एक होतात व त्याची फलश्रुती सामान्य लोकांची होरपळ होण्यात होते हे ‘तमस’ चित्रपटात दाखवण्यात आलंय. अमानवीय मूल्यांसमोर धीटपणे उभे राहण्याचे धैर्य या चित्रपटातून दाखवण्यात आलंय. या चित्रपटात ‘राजो’च्या भूमिकेत झळकलेल्या सुरेखा सिकरी यांचा अभिनय आजही लोकांच्या स्मरणात आहे.
२) किस्सा कुर्सी का
१९७८ साली रिलीज झालेल्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून सरेखा सिकरी यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. राजकारणाच्या अवतीभवती फिरत असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री सुरेखा सिकरी या ‘मीरा’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.
३) बनेगी अपनी बात (टीव्ही मालिका)
१९ च्या दशकात एक सुपरहिट शो होता ज्याच्या स्टोरीनेच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ही मालिका जेव्हा टिव्हीवर दाखवण्यात आली तेव्हा झी टीव्ही हे देशातील पहिलं सॅटलाईट चॅनल होतं. या मालिकेत सुरेखा सिकरी यांनी राधाची भुमिका साकारली होती. यात त्या एक आईच्या रूपातून प्रेक्षकांसमोर झळकल्या. त्यांच्या कामामुळेच सगळे प्रभावीत झाले होते. सुरेखा सिकरी यांची राधा ही भूमिका आजतागायत स्मरणात आहे.
४) मामो
अभिनेत्री सुरेखा सिकरी यांना दुसरा नॅशनल फिल्म अवार्ड मिळवून देणारा हा चित्रपट आहे. श्याम बेनेगल दिग्दर्शित या चित्रपटात मुस्लीम ट्रेलॉजीचा पहिला भाग दाखवण्यात आलाय. या चित्रपटात सुरेखा सिकरी यांनी मुख्य भूमिकेत असलेल्या मम्मोची विधवा बहिण फैय्याजी हिची भूमिका साकारलीय. यात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.
५) सरदारी बेगम
१९९६ साली रिलीज झालेल्या चित्रपटात एका महिलेची कहाणी दाखवण्यात आलीय. यात ती महिला संगीतावरील प्रेमासाठी तिच्या तत्वांना आणि कुटुंबीयांना देखील दूर करते. यातील संगीतावरील प्रेमासाठी घरदार सोडलेल्या महिलेला मदत करणारी ‘इत्तन बाई’च्या भूमिकेला अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी योग्य न्याय दिला.
६) जुबैदा
मनोज बाजपेयी आणि करिश्मा कपूर यांच्या करिअरची सुरवात झालेल्या ‘ज़ुबैदा’ चित्रपटात सुरेखा सीकरी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाला होता. फिल्म इंडस्ट्रीत फ्लॉप ठरलेली अभिनेत्री जुबेदा बेगमवर आधारित हा चित्रपट आहे. यात सुरेखा सिकरी यांनी फेयजी ही भूमिका साकारलीय.
जवळपास ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत सुरेखा यांनी या चित्रपटांप्रमाणेच ‘सलीम लंगड़े पे मत रो’, ‘नसीम’, ‘सरफरोश’, ‘दिल्लगी’, ‘हरी भरी’, ‘काली सलवार’, ‘रघु रोमियो’, ‘रेनकोट’, ‘तुमसा नहीं देखा’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘बधाई हो’, ‘शीर कोरमा’ आणि ‘घोस्ट स्टोरीज’ यांसारख्या अनेक नावाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त सुरेखा यांनी ‘बालिका वधू’, ‘एक था राजा एक थी रानी’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘सात फेरे’, ‘बनेगी अपना बात’, ‘कसर’, ‘कहना है कुछ मुझको’, ‘जस्ट मोहब्बत’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे.