‘बदलापूर’ या आपल्या आगामी चित्रपटातील लूकची शाहिद कपूरच्या ‘हैदर’ चित्रपटातील लूकशी तुलना करणे बरोबर ठरणार नसल्याचे चित्रपटातील प्रमुख अभिनेता वरुण धवनने म्हटले आहे. त्याचबरोबर चित्रपटातील आपले लूक साकारताना भाऊ रोहितच्या दाढीवाल्या लूकचा संदर्भ घेतल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले. चित्रपटातील आपल्या लूकविषयी अधिक माहिती देताना तो म्हणाला, ‘हैदर’ चित्रपटातील शाहिद कपूरच्या लूकशी ‘बदलापूर’मधील माझे लूक साधर्म्य सांगत नाही. ‘हैदर’मध्ये शाहिदने काश्मिरी तरुणाची व्यक्तिरेखा साकारली होती, तर ‘बदलापूर’ चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा जाहिरात कंपनीत कामाला असलेल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या युवकाची आहे. मंगळवारी या चित्रपटाच्या टिझरचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी तो बोलत होता. चित्रपटाचे टिझर इंटरनेटवर प्रसिद्ध झाल्यापासून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात सूडनाट्याचा थरार अनुभवता येणार असून, चित्रपटातील थरारक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी वरुणने कमालीची मेहनत घेतली आहे. आपली ‘लव्हरबॉय’ इमेज मागे सारत सुडाने पेटलेल्या व्यक्तिची थरारकता मोठ्या पडद्यावर दर्शविण्याचे धाडस त्याने या चित्रपटाद्वारे केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम दादा आणि अन्य कलाकारांनी मिळून चित्रपटातील आपले लूक तयार केले असल्याने, भाऊ रोहित धवनच्या दाढीवाल्या लूक व्यतिरिक्त चित्रपटातील आपल्या लूकसाठी कोणताही संदर्भ घेतला नसल्याचे त्याने सांगितले. पुढील वर्षी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात दिव्या दत्ता, यामी गौतम, राधिका आपटे आणि विनय पाठक यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

Story img Loader