रेश्मा राईकवार
छोटय़ा-छोटय़ाच गोष्टी असतात की आयुष्यात आनंद देणाऱ्या, कधी हसवणाऱ्या, कधी रडवणाऱ्या, कधी विचारात पाडणाऱ्या, नात्यांच्या लिप्ततेतही अलिप्तपणे जगायला शिकवणाऱ्या.. प्रत्येकवेळी आपल्याच मनातली हाक ऐकू यायला काहीतरी भयंकर नाटय़ घडावं लागतं असं नाही. आपल्याच कोषातून बाहेर पडण्याची थोडीशी हिंमत करत भवतालात डोकावलं तरी कित्येक गोष्टी नव्याने आकळू लागतात. जाणीव-नेणिवेच्या पातळीवरील भावनांची ही कोरी कोरी झिंग अनुभवण्याची संधी ‘बटरफ्लाय’ हा साधा-सुंदर भावपट देतो.
मुलीची शाळा-तिचा अभ्यास, नवऱ्याचा डबा-त्याचे कपडे, त्याच्या मीटिंग्ज, त्याची स्वप्नं, सासऱ्यांचं औषध-पाणी, त्यांना हवं-नको ते पाहणं, कामवालीच्या मदतीने घरची सगळी सूत्रं सांभाळणं याशिवाय, मामी म्हणून भाचीच्या खरेदीची तयारी, तिची आवड-निवड, नणंदेशी असलेलं घट्ट नातं, आईची माया आणि बहिणीची काळजी या गोष्टी वेगळय़ाच.. हे सगळं एकटय़ाने उत्कृष्ट सांभाळणारी ‘बटरफ्लाय’ची नायिका मेघा. ती उत्कृष्ट पत्नी, सून, आई आणि उत्तम सुगरण असं सगळं काही आहे. या सगळय़ा सुंदर भावविश्वात रमलेल्या मेघाला खटकण्यासारखं तसं म्हटलं तर काही नाही. आणि तिच्यात इतरांना काही खटकावं असंही काही नाही. तिला तिचा एकतरी छंद पूर्ण करावासा वाटतो, पण तिच्याकडून ते होत नाही. नेमकं इथेच ती घरच्यांसाठी चेष्टेचा विषय ठरते आणि तरीही तिच्यालेखी फारसं काही बिघडलं आहे असं नाही. तिनेच मायेने निर्माण केलेल्या कोषातच तिचं अवघं जीवन सुफळ संपूर्ण होऊ शकलं असतंच की.. तरीही एका अलवार क्षणी तिला तिच्या मनातली हाक ऐकू येते. पहिल्यांदाच आपल्या मनातील हाक फक्त ऐकून न थांबता त्याला प्रतिसाद देत पुढे जाण्याच्या मेघाच्या प्रयत्नांची मोठा अर्थ असलेली छोटीशी गोष्ट लेखिका विभावरी देशपांडे हिने ‘बटरफ्लाय’मधून मांडली आहे. विभावरीची गोष्ट त्यातल्या शब्दांपलीकडल्या आशयासह अलवार पडद्यावर रंगवण्याची कमाल दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने साधली आहे.
घरसंसारात रमलेली गृहिणी ते स्वत:ची ओळख घडवू पाहणारी जिद्दी स्त्री हा मेघाच्या मनाचा प्रवास खूप सहजसुंदर पद्धतीने या चित्रपटात पाहायला मिळतो. मुळात असा कथाविषय असेल तर त्यात पुरेपूर भावनिक नाटय़, ताणेबाणे दाखवण्याची संधी दिग्दर्शकाला असते. त्याला भरभक्कम संवादांची जोड दिली जाऊ शकते, पण असं काहीही ‘बटरफ्लाय’ चित्रपटात घडत नाही. अत्यंत सुखद, शांत आणि तरीही आनंदी भावानुभव देणारी चित्रपटाची एकूणच मांडणी निखळ मनोरंजनाच्या अपेक्षाही पूर्ण करते. त्याचबरोबरीने काहीतरी चांगलं, समजून-उमजून घ्यावं असं पाहिल्याची जाणीवही मनाला सुखावून जाते. उत्तम कथेला सहज अभिनयातून न्याय देण्याची ताकद असणारे कलाकार निवडले की अर्धी बाजी जिंकल्यासारखी असते अशी भावना कित्येकदा दिग्दर्शक व्यक्त करतात. त्याची प्रचीती या चित्रपटातही येते.
अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिजीत साटम ही खऱ्या आयुष्यातील पती-पत्नीची जोडी इथे पडद्यावरही त्याच भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. मधुरा आणि अभिजीत दोघांनाही बऱ्याच काळानंतर इतक्या छान भूमिकेतून मोठया पडद्यावर पाहणं हीच पर्वणी आहे. या दोघांनी खूप सहजपणे मेघा आणि विराजचं आंबट-गोड नातं पडद्यावर खुलवलं आहे. प्रदीप वेलणकर यांनी त्यांच्या सहजशैलीत मेघाच्या सासऱ्यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर बॅडिमटन प्रशिक्षकाच्या भूमिकेत कमालीचे छान दिसले आहेत. ‘कोरी कोरी झिंग’ आणि ‘धागे’ ही वैभव जोशी यांनी लिहिलेली आणि संगीतकार शुभाजित मुखर्जी यांनी संगीत दिलेली दोन्ही गाणी श्रवणीय आहेत. मोजक्या व्यक्तिरेखा, बांधेसूद कथा, साधेसोपे संवाद, उत्तम कलाकार आणि खुसखुशीत दिग्दर्शकीय मांडणी या सगळय़ाच्या जोरावर भारी फीिलग देणारा ‘बटरफ्लाय’ हा सुंदर भावपट आहे.
बटरफ्लाय
दिग्दर्शक – मीरा वेलणकर
कलाकार – मधुरा वेलणकर-साटम, अभिजीत साटम, प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर, सोनिया परचुरे आणि राधा धारणे.