‘हमिदाबाईची कोठी’ हे नाटककार अनिल बर्वे यांचं गाजलेलं नाटक.. एकेकाळी गाणंबजावणं आणि नृत्य-अदाकारीच्या मैफली रंगणाऱ्या कोठय़ांच्या ऱ्हासकाळाचं चित्रण करणारं हे नाटक! या ऱ्हासपर्वातही आपल्या उसूलशी इमान राखू पाहणाऱ्या आणि त्यापायी सर्वस्वानं बरबाद होणाऱ्या माणसांची ही दर्दभरी कहाणी. या नाटकाचा बाज आहे तो उन्नत, उदात्त, उत्कट शोकांतिकेचा! मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स निर्मित, मिलिंद इनामदार दिग्दर्शित द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘हमिदाबाईची कोठी’चा प्रयोग पाहण्याचा योग नुकताच आला. आतापावेतो ‘हमिदाबाई’चे जे प्रयोग सादर झाले ते बंदिस्त थिएटमधील प्रोसिनियमच्या चौकटीतले. त्यामुळे ‘हमिदाबाईची कोठी’चा भवताल असलेला मोहल्ला फक्त प्रेक्षकांच्या मनोभूमीवरच साकारत असे. परंतु अकॅडमीचा हा ‘हमिदाबाई’चा प्रयोग खुल्या मुक्ताकाश रंगमंचावर सादर झाल्यानं कोठीबाहेरचं अधोविश्वही दिग्दर्शकानं त्यातल्या बारीकसारीक तपशिलांनिशी उभं केलं आहे. ही या प्रयोगाची खासीयत होती. कोठीबाहेरच्या या भोवतालाची निर्मिती केल्याने साहजिकच प्रयोगकर्त्यांना संहितेबाहेरच्या काही नव्या पात्रांचा आधार घ्यावा लागला आहे. त्यात मग त्यांचं जगणं, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती, मोहल्ल्याचं एक विशिष्ट तत्त्वज्ञानही आलंय. दिग्दर्शकानं या प्रयोगाचं केलेलं अर्थनिर्णयन हीसुद्धा एक वेगळी बाब यात आढळते.
ग्रामोफोन, रेडिओवरील संगीताच्या- विशेषत: चित्रपट संगीताच्या आगमनामुळे कोठीवरच्या गाणंबजावण्याला कसर लागली. बदनामी सोसून कोठीवरचं गाणं ऐकायला जाण्यापेक्षा रसिक दर्दी घरातच आपल्या पसंतीचं संगीत ऐकायची सोय झाल्यानं कशाला कोठीची पायरी चढतील? साहजिकच कोठीवर गाणंबजावणं, नृत्यअदाकारी करणाऱ्यांना पोटासाठी आपल्या देहाचा बाजार मांडण्याखेरीज गत्यंतर उरलं नाही. या स्थित्यंतरास ठामपणे नकार देत हमिदाबाई मात्र आपल्या कोठीची शान व इभ्रत टिकवून ठेवण्यासाठी जीव पाखडते. परंतु निष्ठुर काळ तिलाही हतवीर्य करतो. एकेक साथीदार निघून जातात. कोठीवरची नृत्य-अदाकारा सईदाही पोटाची आग विझवण्यासाठी आपल्या देहाचाच सहारा घेते. सत्तार आणि बाहरवाला कोठीशी निष्ठा ठेवून राहतात खरे; परंतु त्यांचंही चित्त थाऱ्यावर नसतं. वेश्यांची दलाली करणारा सत्तार सईदावर जीव लावून आहे. पण तिला पोसण्याची ताकद नसल्यानं तिचं बाजारात बसणं स्वीकारण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. मात्र, तिच्याशी संसार थाटायचं त्याचं स्वप्न असतं. त्याकरता तो एका मुलीला वेश्याव्यवसायात आणण्याचं काम घेतो आणि पोलिसांच्या तावडीत सापडतो. त्याला सोडवण्यासाठी सईदा आकाशपाताळ एक करते. पण तिच्या खटपटीला यश येत नाही. या धडपडीत तिच्या नशिबीही रस्त्यावरची मौत येते.
हमिदाबाई आपल्या उसूलशी बेइमानी करण्याचं नाकारत कर्जाच्या खाईत रुतत जाते. हमिदाबाईचे मालक खॉंसाहेब अल्लाला प्यारे होतात आणि तिच्यावर आकाशच कोसळतं. मुलीला- शब्बोला या गंदगीपासून दूर शिक्षणासाठी तिनं होस्टेलवर ठेवलेलं असतं. पण फी भरू न शकल्यानं तिला शिक्षण अर्धवट सोडून घरी परतावं लागतं. हमिदाबाईची सर्व बाजूंनी कोंडी होते. चहूबाजूचा ताण असह्य़ होऊन शारीरिक-मानसिकदृष्टय़ा खचलेली हमिदाबाईही एके दिवशी हे जग सोडून जाते. उरते एकाकी शब्बो. या मोहल्ल्याचे कुठलेच संस्कार तिच्यावर झालेले नसतात. त्यामुळे ती हडबडून जाते. तशात तिला घरसंसाराचं स्वप्न दाखवणारा पांढरपेशा बाबूजीही समाजाच्या भीतीनं तिला वाऱ्यावर सोडतो. निरुपायानं मोहल्ल्यातल्या लुक्कादादाशी लग्न करण्यावाचून तिच्यासमोर पर्याय उरत नाही. पण तरी तिचं नष्टचर्य संपत नाही. वस्तीत नवा दादा पैदा होतो आणि लुक्काचं साम्राज्य लयाला जातं. त्याच्यावर तोंड लपवून जगण्याची पाळी येते. तो कोठीवर भट्टी लावतो.. शब्बोला धंद्याला लावण्यापर्यंत घसरतो..
लेखक अनिल बर्वे यांनी अधोविश्वात संगीतावरील अव्यभिचारी निष्ठेवर जगू पाहणाऱ्या हमिदाबाईची आणि तिच्या पश्चात कोठीची इभ्रत सांभाळू पाहणाऱ्या शब्बोची शोकांतिका यात रेखाटली आहे. या आकांतकाळात दोघीही संपतात, परंतु आपल्या उसूलला मात्र त्या किंचितही धक्का पोहचू देत नाहीत. या प्रयोगात मात्र दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांनी नाटकाचं अर्थनिर्णयन करताना- ‘माणसासमोर जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न आ वासून उभा ठाकतो, तेव्हा निरुपायानं तो परिस्थितीला शरण जातो..’ या निष्कर्षांवर नाटकाचा शेवट बदलून शब्बोला देहविक्रयाला राजी केलं आहे. हा बदल अत्यंत धक्कादायक आहे. जो मूळ संहितेवर अन्याय करणारा आहेच; परंतु त्याचबरोबर नाटकाच्या मांडणीवरही संपूर्ण बोळा फिरवणारा आहे.
शब्बोनं बाजारात बसायचा पर्याय स्वीकारण्याऐवजी तत्पूर्वी आलेली कोठी विकण्याची ऑफर मग का स्वीकारली नाही? किमान त्यातून मिळालेल्या लाखभर रुपयांत तिचं आयुष्य आरामात मार्गी लागलं असतं. मोहल्ला सोडून दूर कुठंतरी ती नक्कीच आपलं आयुष्य नव्यानं सुरू करू शकली असती. आणखीन एक : हे नाटक जसं ‘असामान्य’ हमिदाबाईचं आहे, तितकंच.. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक सामान्यांतल्या असामान्यत्वाचं आहे. यात सईदा किंवा सत्तार वा बाहरवालासारखी पतित सामान्य माणसंही प्रसंगी आपल्या उसूलसाठी आयुष्य पणाला लावतात. सत्तारनं आपल्यासारखं बेवारसपण दुसऱ्याच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून (बापाचा अतापता नसलेल्या) सईदाच्या पोटातल्या बाळाला बाप म्हणून आपलं नाव देण्याची दाखवलेली तयारी, किंवा सईदाबरोबर संसार थाटण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या पापकर्मातून जसं हे असामान्यत्व दिसून येतं, तसंच सत्तारला तुरुंगातून सोडविण्यासाठी सर्वस्व उधळणाऱ्या सईदाच्या मनस्वीतेतूनही ते जाणवतं. हमिदाबाईची कोठी अपवित्र होण्याआधीच तिथून बाहेर पडणाऱ्या बाहरवाल्याच्या वर्तनातही ते दिसतं. मग हमिदाबाई आणि शब्बोसाठी तर कोठीचं पावित्र्य हे प्राणापेक्षाही प्रिय असणार यात शंकाच नाही. असं असताना नाटकाच्या या मुख्य गाभ्यालाच तडा देणारा अन्वयार्थ दिग्दर्शक लावत असेल तर ते निश्चितच अक्षम्य आहे. नाटकाच्या मूळ लेखकाला बिलकूलच अभिप्रेत नसलेला अन्वय लावण्याऐवजी याच विषयावर दुसरं नवं नाटक त्यांनी लिहवून घेतलं असतं तर ते उचित ठरलं असतं. असो.
एक ‘प्रयोग’ म्हणून दिग्दर्शकानं कोठीबाहेरचा जो वास्तवदर्शी माहोल उभा केला आहे तो दाद देण्याजोगा आहे. त्यातले सूक्ष्म तपशील लक्षवेधी आहेत. वातावरणनिर्मितीकरता तत्कालीन चित्रपटगीतांचा केलेला वापरही चपखल. भोवतालच्या ऱ्हासाचं चित्र त्यातून यथार्थपणे उभं ठाकतं. परंतु हे करत असताना मुख्य नाटय़ावरून लक्ष काहीसं विचलित होतं, हेही खरं. यात हमिदाबाईचा मृत्यू नको इतका ताणल्यानं अत्यंत बटबटीत झाला आहे. सईदा-सत्तारमधील उत्कट भावबंधही या गदारोळात हरवले आहेत. शब्बोची कोंडीही ज्या तीव्रतेनं यायला हवी तशी ती येत नाही. त्यामुळे तिचं परिस्थितीशरण होणंही पचनी पडत नाही. काही गोष्टींसाठी मात्र दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांना श्रेय द्यायलाच हवं. लुक्कादादा, बाहरवाला, बाबूजी ही पात्रं अस्सल हाडामांसाची उतरली आहेत. विशेषत: लुक्कादादामध्येही एक कोमल ‘माणूस’ दडलेला आहे, हे या प्रयोगात प्रकर्षांनं जाणवतं. त्याच्या अवनतीचा प्रवास त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करतो. तथापि ज्या शब्बोसाठी तो पंटरच्या उरावर बसतो, तिलाच नंतर बाजारात बसवताना त्याच्या मनाला इंगळ्या डसताना दिसत नाहीत, हे चांगलंच खटकतं. पात्रांना दिलेल्या विशिष्ट लकबी व व्यवहारांतून ती सर्वागानं जिवंत होतात. शब्बो मात्र बरीच दुर्लक्षिली गेली आहे. तिचा मानसिक प्रवास नाटकात नीटसा येत नाही.
प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेनुसार अंकुश कांबळी यांनी हमिदाबाईची दुमजली कोठी आणि तिचा भोवताल वास्तवदर्शी उभा केला आहे. यातल्या विविध स्थळांचा दिग्दर्शकानं चांगला वापर करून घेतला आहे. सृजन देशपांडे व पवन यांचं शास्त्रीय संगीत आणि अरविंद हसबनीस यांचं रेकॉर्डेड संगीत यांचा वातावरणनिर्मितीत मोलाचा वाटा आहे. भूषण देसाई यांच्या प्रकाशयोजनेचंही प्रयोगाच्या नाटय़पूर्णतेत महत्त्वाचं स्थान आहे. दीपाली विचारेंचं नृत्यआरेखन, संध्या साळवे यांची वेशभूषा आणि कृष्णा बोरकर व उल्हेश खंदारे यांच्या रंगभूषेनं ‘हमिदाबाई’ला अस्सलपणा दिला आहे.
प्राजक्ता वाडय़े यांनी हमिदाबाईच्या भूमिकेत मृत्यूचा नाटकी प्रसंग वगळता चांगलेच रंग भरले आहेत. त्यांचं गाण्याचं अंगही लक्षवेधी. सईदाची आग आणि तिचं माणूसपण मनाली जाधव यांनी अचूक टिपलं आहे. लुक्कादादाचा अध:पतनाचा प्रवास शशी पवार यांनी अत्यंत तपशिलांत रेखाटला आहे. लॉरेन्स क्षेत्रे यांचा बाहरवाला लाजवाब. विश्वेश जोशींनी सत्तारचा दर्द, त्याची अगतिकता, सईदावरचं त्याचं उत्कट प्रेम आणि परिस्थितीवर मात करण्याची त्याची धडपड नेमकी दाखवली आहे.
चेतन शुशीर यांचा बाबूजी पुलंच्या सखाराम गटणेची आठवण करून देतो. समीहा सुळे यांना शब्बोचं अंतरंग मात्र नीटसं सापडलेलं नाही. तिचे मानसिक-भावनिक हिंदोळे नाटकात कुठंच येत नाहीत. अन्य कलावंतांनीही आपली कामं चोख केली आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा