यशस्वी चित्रपटाचे समीकरण हे आजवर त्याची लोकप्रियता आणि तिकीटबारीवरची कमाई या दोन्हीतूनच जुळते असा एक सूर गेली अनेक वर्ष चित्रपट उद्योगात आहे. हिंदीत तर तो प्रघातच आहे पण, सातत्याने आशयात्मक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या मराठी चित्रपटांनाही या समीकरणाकडे दुर्लक्ष करून पुढे जाता आलेले नाही. किंबहुना, गेल्या वर्षभरात तर मराठी चित्रपटांनी कोटींची कमाई करत आपण समीक्षकांच्या कौतुकावरच समाधानी नाही. तर मराठीतले दर्जेदरा चित्रपट व्यावसायिक यशही मिळवू शकतात, हे दाखवून दिले आहे. या यशात यावर्षीही नऊ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने आणखीनच भर पडली आहे. त्यातही कोणत्यातरी एकाच नव्हे तर वेगवेगळ्या मराठी चित्रपटांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. सातत्याने राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवल्याने मराठी चित्रपटांविषयीची चर्चा हिंदीतही होऊ लागली आहे. त्यामुळे या पुरस्कारांनंतर तरी मराठी चित्रपटनिर्मितीसाठी केवळ व्यावसायिक यशाची फुटपट्टी लावली जाणार नाही ना? मराठीतल्या त्याच दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठीचे अर्थकारण बदलेल का?..
बदल व्हायला हवा
‘धग’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही एक दिग्दर्शक म्हणून आपल्याला हव्या असणाऱ्या कथांसाठी निर्माते पुढे येतात असा माझा तरी अनुभव नाही. त्यांना खूप गोष्टी पटवून द्याव्या लागतात. मग कुठेतरी नाही आपण एखादा हलकाफुलका चित्रपट करू मग तुमच्या मनासारखा करू.. अशी काहीतरी उत्तरे मिळतात. मी स्वत: राजन खान यांच्या कथेवरचा चित्रपट करण्यासाठी निर्मात्यांना भेटलो पण, अशाप्रकारच्या अनवट कथांवर चित्रपटनिर्मिती करण्यासाठी बऱ्याचदा निर्माते तयार नसतात. म्हणून सध्या मी एक विनोदी चित्रपट करतो आहे. पण, गेली काही वर्ष नेमाने मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. गेल्यावर्षी ११ पुरस्कार, आता नऊ पुरस्कार अगदी पुढच्या वर्षीही मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार, हा विश्वास वाटतो आहे. कारण, आत्ताच्या तरूण दिग्दर्शकांकडे फार वेगळे विषय आहेत, त्यांचे दृष्टिकोन, त्यांची प्रत्येकाची शैली ही वेगळी आहे. या पुरस्कारांमुळे का होईना निर्मात्यांना कुठेतरी हुरूप येईल आणि ते नक्कीच वेगळ्या विषयांवरच्या चित्रपटनिर्मितीचे धाडस दाखवतील, अशी मला आशा आहे.
शिवाजी लोटन पाटील, दिग्दर्शक

बदलाची प्रक्रिया सुरू आहे
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आपल्याकडे सामाजिक आणि सांस्कृतिक आशय असलेल्या चित्रपटांची निर्मिती जास्त होईल, असे मी म्हणणार नाही. कारण, असे आशय आपल्याकडे आधीपासूनच हाताळले जात आहेत. असे विषय हाताळण्याची क्षमता ही मराठी चित्रपटांमध्येच जास्त आहे. इतरत्र ती कुठेही आढळत नाही. यावेळी पाच वेगवेगळ्या मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत  यातून एक गोष्ट साध्य होईल ती म्हणजे आपल्याकडे जी तरूण दिग्दर्शकांची पिढी आहे. ज्यात नागराज आहे, परेश मोकाशी, सतीश मन्वर, अरूण-अविनाश आणि वेगवेगळी शैली हाताळणारे जे हे दिग्र्शक आहेत त्यांच्यात एक दर्जेदार सकस चित्रपट करण्यासाठीचं सकारात्मक आणि तितकंच आव्हानात्मक, सर्जनशील असं वातावरण तयार होईल. निर्मितीच्या बाबतीत म्हणायचे तर ही प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. यावर्षी परेशचा वेगळा चित्रपट आहे, उमेशचा ‘हायवे’ आहे, अरूण-अविनाशचा ‘किल्ला’ आहे, ‘कॉफी आणि बरंच काही’ नावाचा चित्रपट येतो आहे.  याचाच अर्थ दर्जेदार चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया कधीच सुरू झालेली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमुळे या प्रक्रियेत एकप्रकारचे सातत्य येईल.
निखिल साने, बिझनेस हेड, एस्सेल व्हिजन

निर्मात्यांना प्रेरणा मिळते
निश्चितच, पुरस्कारांमुळे निर्मात्यांनाही एक ओळख मिळते. त्यांनाही नवनविन चित्रपटनिर्मितीसाठी प्रेरणा मिळते. यावर्षी नऊ राष्ट्रीय पुरस्कार मराठी चित्रपटांना मिळाले आहेत ही प्रगतीची खूण आहे. त्याहीपुढे जाऊन सातत्याने राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या मराठी चित्रपटांनी हे दाखवून दिलं आहे की मराठीत केवळ दर्जेदार चित्रपटनिर्मितीच होते.
संजय छाब्रिया, निर्माता

निर्मितीत सुधारणा होईल
मराठीत चांगले चित्रपट नेहमीच येतात. पण, बऱ्याचदा ते चित्रपट लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीत. म्हणून मग ते व्यावसायिकदृष्टय़ा मार खातात. आणि त्यांना व्यवसाय करता आला नाही तर मग निर्मातेही पुढे येत नाहीत. ही जी काही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ना त्यात या पुरस्कारांमुळे सुधारणा होईल. म्हणजे निर्मात्यांचा दृष्टिकोन बदलेल आणि तेही चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करतील. मुळातच, सातत्याने वेगवेगळे चित्रपट करण्याचा आपला प्रयत्न हा कायम राहिलाच पाहिजे. मात्र, चित्रपट मनोरंजकही झाला पाहिजे याचीही काळजी घ्यायला हवी.
उत्तुंग ठाकूर, निर्माता

Story img Loader