नीरज घायवन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मसान’ या पहिल्याच चित्रपटाला कान चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात ‘इंटरनॅशनल ज्युरी ऑफ फिल्म क्रीटिक्स’ पुरस्कार व ‘प्रॉमिसिंग फ्युचर’ पुरस्कार या दोन पुरस्कारांचा समावेश आहे. या चित्रपटात रिचा चढ्ढा, संजय मिश्रा, विकी कौशल, श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पहिल्यापासूनच या चित्रपटाचा महोत्सवात गाजावाजा होता. या चित्रपटाला सर्वानी पाच मिनिटे उभे राहून दाद दिली.
घायवन यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की मसान चित्रपटास पुरस्कार मिळाले असून भारतासाठी बऱ्याच काळापासून पुरस्कार मिळणे बाकी होते. त्यांनी अनुराग कश्यप यांचा उल्लेख करून म्हटले आहे, की मी तुमचा शिष्य शोभलो आहे. रिचा हिने ट्विटरवर म्हटले आहे, की कान येथे दोन पुरस्कार मिळाल्याने रोमांचित झाले. सर्वाची आभारी आहे. मसानची निर्मिती मनीष मुंद्रा यांनी मकासर प्रॉडक्शन, फँटम फिल्म्स, शिख्या एंटरटेनमेंट व पाथे इंटरनॅशनल (फ्रेंच) या कंपन्यांनी केली होती.
भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेकांनी मसानच्या यशाचे स्वागत केले आहे. अभिनेत्री शबाना आझमी यांनी सर्वाचे अभिनंदन करताना म्हटले आहे, की घायवन, मुंद्रा, अनुराग कश्यप या सर्वाचे अभिनंदन. अभिनेता अंशुमन खुराणा याने म्हटले आहे, ग्रोव्हर साहेब तुमचे अभिनंदन व सगळ्या चमूचा आम्हाला अभिमान वाटतो.

Story img Loader