‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बिगूल वाजले रे वाजले की देशविदेशातील अनेक कलाकारांप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची, विशेषत: अभिनेत्रींच्या नावाची एकच चर्चा होऊ लागते. गेल्या काही वर्षांत आपापल्या चित्रपटांच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने, तर कधी ज्या ब्रॅण्डशी ते जोडले गेले आहेत त्यांच्या प्रसिद्धी कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक कलाकार आवर्जून ‘कान’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावतात. या महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या भारतीय अभिनेत्रींची संख्या वर्षांगणिक वाढते आहे. त्यामुळे दरवर्षी कान महोत्सवाच्या निमित्ताने या अभिनेत्रींच्या रेड कार्पेट लुकचीच चर्चा अधिक होते.
७६ वा कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फ्रान्समध्ये सुरू झाला असून २७ मेपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाला दरवर्षी हजेरी लावणाऱ्या भारतीय अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या रायचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ऐश्वर्या आणि तिचे कानच्या रेड कार्पेटवरील लुक्स हा कधी तिच्या चाहत्यांसाठी कौतुकाचा, तर कधी हेटाळणीचा विषय असतो. यंदाही ऐश्वर्या कानसाठी हजर झाली. २१ व्यांदा या महोत्सवाला हजेरी लावताना ऐश्वर्याने पुन्हा एकदा आपल्या ड्रेस आणि लुकबाबत चाहत्यांना धक्का आहे. पूर्णपणे चंदेरी रंगाचा हुडी ड्रेस परिधान केलेल्या ऐश्वर्याचा हा लुक यंदा तिच्या काही चाहत्यांना आवडला, तर काहींसाठी तो पुन्हा गमतीचा विषय ठरला. अनेकांनी तिच्या या लुकची तुलना हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटातील जादूशी केली. मात्र कौतुक होवो वा टीका.. ऐश्वर्याने नेहमीच्या सहजतेने आणि तिच्या खास शैलीत सोफी कुटुरने डिझाईन केलेल्या या खास कान महोत्सवातील कलेक्शनमधील ड्रेस घालून टेचात रेड कार्पेटवर मिरवला. ऐश्वर्याबरोबर दरवर्षी कान महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या आणखी कोण कोण अभिनेत्री रेड कार्पेटवर दिसणार हे कळेलच, मात्र यंदा सगळय़ात जास्त उत्सुकता आहे ती पहिल्यांदाच या रेड कार्पेटवर मिरवणाऱ्या अभिनेत्रींची..
कान महोत्सव सुरू झाल्यापासून पहिल्या दोन दिवसांत अभिनेत्री सारा अली खान, मानुषी छिल्लर यांनी पहिल्यांदाच या महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि सध्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवणारी मृणाल ठाकूरही यंदा पहिल्यांदाच कान महोत्सवाच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणार असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, अभिनेत्री ईशा गुप्ता आणि उर्वशी रौतेला यांनीही कान महोत्सवाला हजेरी लावली आहे. त्यातल्या त्यात ऐश्वर्या रायच्या लुकनंतर चर्चा झाली ती अभिनेत्री सारा अली खानने रेड कार्पेटसाठी निवडलेल्या ड्रेस आणि लुकची.. साराने ‘जरा हटके जरा बचके’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या कान महोत्सवातील प्रसिद्धीसाठी अभिनेता विकी कौशलबरोबर रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे. रेड कार्पेटवरील तिच्या लुकसाठी तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबु जानी-संदीप खोसला यांच्या भारतीय पारंपरिक पेहरावाची निवड केली. पहिल्या दिवशी मोतिया रंगाचा रेशमी धाग्यांचे विणकाम असलेला लेहंगा आणि चोली अशा पारंपरिक ड्रेसची केलेली निवड तिच्या चाहत्यांना भावली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तिने साडीला प्राधान्य दिले. कान महोत्सवात पारंपरिक भारतीय पोशाखात वा साडी पारिधान करून रेड कार्पेटवर वावरणारी ती पहिली अभिनेत्री नाही. याआधी ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण, सोनम कपूर आणि विद्या बालन यांनीही साडी नेसूनच रेड कार्पेटवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. तरीही साराच्या या पारंपरिक भारतीय लुकचे कौतुक करण्याचा मोह तिच्या चाहत्यांना आवरला नाही, तर काहींनी तिच्यावर समाजमाध्यमातून टीकाही केली. ‘मिस वल्र्ड’ आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरने रेड कार्पेटवर व्हाइट गाऊन परिधान केला होता, तर अभिनेत्री ईशा गुप्ताने पेस्टल गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
समाजमाध्यम प्रभावकही रेड कार्पेटवर..
कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि रेड कार्पेटवरचा हा फॅशनप्रवेश आता केवळ तारांकित कलाकारांपुरता मर्यादित राहिलेला नाही. गेल्या काही वर्षांत डिजिटल आशयनिर्मितीसाठी ओळखले गेलेले अनेक भारतीय कलाकारही कानच्या रेड कार्पेटवर दिसणार आहेत. रुपेरी पडद्यावर प्रसिद्ध असलेल्या तारांकित कलाकारांबरोबरच मनोरंजन आणि अन्य विषयावरील पॉडकास्ट, यूटय़ूब वाहिनीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले इन्फ्लूएन्सर्सही कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहोचले आहेत. पॉडकास्टमुळे नावारूपाला आलेला ‘बीअरबायसेप्स’ रणवीर अलाहाबादी, वेगवेगळय़ा भाषेतील चित्रपट संगीत वा जाहिरातींच्या शीर्षगीतांवर नृत्याचे व्हिडीओ सादर करणारी रुही दोसानी यांनी पहिल्यांदाच कान महोत्सवाला हजेरी लावली आहे, तर निहारिका एनएम ही डिजिटल आशयनिर्मितीसाठी प्रसिद्ध असलेली कलाकार दुसऱ्यांदा कान महोत्सवात रेड कार्पेटवर हजेरी लावणार आहे. मॉक एन्टरटेन्मेट या कंपनीने ब्रूट इंडियासह या डिजिटल आशयनिर्मिती करणाऱ्या प्रसिद्ध कलाकारांना ‘कान’वारीवर पाठवले आहे. मॉक एन्टरटेन्मटचे सहसंस्थापक विराज सेठ यांनी सांगितले, कान महोत्सवाला या डिजिटल आशयनिर्मिती करण्यासाठी लोकप्रिय असलेल्या कलाकारांची रेड कार्पेटवरील हजेरी हा आमच्या अभिमानाचा विषय आहे. तर मुळात हे डिजिटल माध्यमावरील कलाकार आता खऱ्या अर्थाने तारांकित झाले आहेत. चित्रपट – मालिकेतील कलाकारांप्रमाणेच तेही तारांकित झाले आहेत. त्यांचा प्रत्येकाचा लाखोंच्या घरात चाहतावर्ग आहे. या कानवारीच्या माध्यमातून हे कलाकारही आपल्याला आवश्यक असलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसणार आहेत, असेही ब्रूट इंडियाचे मुख्य संपादक महेश कसबेकर यांनी स्पष्ट केले.