कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्रां प्री पुरस्कार मिळवत विजयाची मोहोर उमटवणाऱ्या पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटाचे जगभरात कौतुक झाले. कान चित्रपट महोत्सवात गेल्या तीस वर्षांत मानाचा पुरस्कार मिळवणारा पहिलाच भारतीय चित्रपट म्हणून मायदेशातही हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला. आता हा बहुचर्चित, बहुप्रशंसित चित्रपट अखेर देशभरात प्रदर्शित होणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचे वितरक, निर्माते यांनी जाहीर केले आहे.

‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटाने कान महोत्सवात पुरस्कार मिळवल्यापासून या ना त्या कारणाने हा चित्रपट चर्चेत राहिला आहे. ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट पाठवण्यात आला. तेव्हाही ‘लापता लेडीज’ ऐवजी ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’सारखा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट का पाठवण्यात आला नाही? अशी टीका झाली. त्यामुळे एकूणच या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> ‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन, आमनेसामने

नुकताच हा चित्रपट सध्या सुरू असलेल्या मामि महोत्सवातही शुभारंभाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला. त्यामुळे काही मोजक्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता आला असला तरी अजून देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे चित्रपटाची दिग्दर्शिका पायल कपाडिया आणि वितरणाची बाजू सांभाळणारा अभिनेता राणा दग्गुबाती याने स्पष्ट केले आहे. राणा दग्गुबाती याच्या ‘स्पिरिट मीडिया’ या कंपनीच्या वतीने ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ हा चित्रपट देशात आणि परदेशातही वितरित केला जाणार आहे. भारताबरोबरच ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्येही नोव्हेंबर महिन्यातच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती दग्गुबाती याने दिली. ‘हा चित्रपट बनवण्यासाठी अनेक वर्षं काम करावं लागलं आहे आणि ‘स्पिरिट मीडिया’च्या माध्यमातून आता ही कलाकृती सगळीकडे पोहोचणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळीकडे प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी मी खूप उत्सुक आहे. यानिमित्ताने, पहिल्यांदाच माझा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा >>> नाट्यरंग : ‘त्या तिघी’ हिमालयाच्या सावल्यांची खडतर आयुष्यं

अखेर भारतीय प्रेक्षक तिकीट खरेदी करून चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर हा चित्रपट अनुभवू शकणार आहेत याचा खूप आनंद वाटतो. चित्रपटगृहातील त्या भव्य पडद्यावरच खऱ्या अर्थाने सिनेमा जिवंत होत असतो. त्यामुळे ही खूप वेगळी अनुभूती आहे’, अशा शब्दांत पायल कपाडिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा पद्धतीच्या अर्थपूर्ण कलाकृती देशभरातील प्रेक्षकांना पाहायला मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो, असे अभिनेता राणा दग्गुबाती याने स्पष्ट केले. त्यामुळे ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’सारखा वैश्विक स्तरावर लोकप्रिय ठरलेला चित्रपट भारतीय चित्रपटगृहांत प्रदर्शित करताना आनंद होत असल्याचेही त्याने सांगितले. हा चित्रपट मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूरु, हैदराबाद, पुणे, कोची. थिरुवनंतपुरम आणि कोलकातासारख्या शहरांमध्येही प्रदर्शित होणार आहे.