अभिनेता म्हणून ‘कॅरी ऑन मराठा’ हा माझा पहिलाच चित्रपट असला तरी मी यापूर्वी ‘पृथ्वी थिएटर’च्या प्रायोगिक नाटकांमधून काही र्वष काम केले आहे. आगामी ‘देऊळबंद’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबरोबर काही प्रायोगिक नाटके केली आहेत. नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नसले तरी अनुभवातून व शिकत शिकत नृत्य कलाकार म्हणून काही ‘शो’मधून सहभागी झालो आहे. गेली काही वर्षे माझ्या स्वत:च्या नृत्य अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नृत्याचे धडेही देत आहे. ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय कार्यशाळाही मी केली आहे. एक कलाकार म्हणून हा सर्व प्रवास माझ्यासाठी मला समृद्ध करणारा असा अनुभव ठरला आहे, असे अभिनेता गश्मीर महाजनी याने ‘रविवार वृत्तान्त’ला सांगितले.
माझ्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’च्या हिरोसारखा नायक मिळाला असे जेव्हा बोलले जाते. कोणत्याही कलाकाराचे शरीर हे सुदृढ असलेच पाहिजे. वाचिक अभिनयाबरोबरच कायिक अभिनयासाठीही ते अत्यंत महत्त्वाचे आहे. कलाकार व्हायचे ठरविले तेव्हाच मी अभिनयाबरोबर माझ्या शरीराकडे लक्ष द्यायचे ठरविले. मी आजही नियमित व्यायाम करतो. खरेतर प्रत्येक कलाकाराने आपल्या आरोग्याची आणि शरीराची काळजी घेतली पाहिजे, असेही गश्मीरने सांगितले. ‘कॅरी ऑन मराठा’ आणि ‘देऊळबंद’ या चित्रपटांतील भूमिकांविषयी विचारले असता त्याने सांगितले, ‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटाचे चित्रीकरण पहिल्यांदा सुरू झाले. ते संपल्यानंतरच ‘देऊळबंद’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला मी सुरुवात केली. दोन्ही चित्रपटांमधील माझ्या भूमिका परस्परांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत. ‘कॅरी ऑन मराठा’मध्ये मी अस्सल कोल्हापुरी व ग्रामीण भागातील तरुण रंगविला आहे. तर ‘देऊळबंद’मध्ये उच्चशिक्षित आणि ‘नासा’मध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञाची भूमिका मी करतो आहे. दोन्ही व्यक्तिरेखा या वेगळ्या असल्याने त्या साकारणे आव्हान होते. पण, दोन्ही भूमिकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
या क्षेत्रात आल्यानंतर एक ज्येष्ठ अभिनेते आणि वडील म्हणून रवींद्र महाजनी यांच्याकडून काय मार्गदर्शन किंवा सल्ला मिळाला यावर गश्मीर म्हणाला, ‘खरे सांगू, बाबा मला तू अमूक कर, तमूक कर असे काहीही सांगत नाहीत. किंवा कोणती सक्तीही करत नाहीत. शिकवून काही होणार नाही, तर स्वत: अनुभव घेत त्यातून शिकत जा’, असे त्यांचे सांगणे असते. नासिरुद्दीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभिनय कार्यशाळा केली तेव्हाही त्यांनी हे अशा प्रकारे कर, हा संवाद असा म्हण, अशा पद्धतीने कधीही शिकविले नाही. कलाकार म्हणून स्वत:हून त्या भूमिकेचा शोध घ्यायला सांगून त्यांनी आम्हाला तयार केले. एक कलाकार म्हणून भूमिकेचा शोध घेण्याची प्रक्रिया ही कधी थांबता कामा नये. ती अव्याहतपणे सुरू राहिली पाहिजे.
कन्नड भाषा आणि व्यक्तिरेखेचे आव्हान
कश्मिरा कुलकर्णी
‘कॅरी ऑन मराठा’ या चित्रपटात माझी व्यक्तिरेखा कन्नड भाषक आहे. माझी मातृभाषा मराठी असल्याने चित्रपटातील कन्नड भाषक व्यक्तिरेखा आणि कन्नड भाषेचे आव्हान माझ्यापुढे होते. पण अभ्यास आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण ती भूमिका पार पाडली, असे चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिने ‘रविवार वृत्तान्त’ला सांगितले.
चित्रपटाविषयी कश्मिरा म्हणाली, हा चित्रपट महाराष्ट्रीय मुलगा आणि कन्नड मुलगी यांची प्रेमकथा आहे. यात मी ‘कुसुम दोड्डावले’ ही भूमिका साकारली आहे. कर्नाटकातील एका गावातील ही मुलगी कन्नड संस्कृतीत, घरच्या करडय़ा शिस्तीत वाढलेली. घरात आणि आजूबाजूला फक्त कन्नड भाषाच बोलली जाते, असे वातावरण आहे. त्यामुळे मला सुरुवातीला भीती वाटत होती. पण, अभ्यास व सर्वाच्या सहकार्याने हे आव्हान आपण पेलले. चित्रपटातील अनेक दृश्ये ही कर्नाटकात त्या त्या ठिकाणी चित्रित करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने कन्नड संस्कृती अनुभवायला आणि कन्नड भाषा शिकायला मिळाली.
भूमिका साकारताना घेतलेल्या मेहनतीविषयी तिने सांगितले, माझी मातृभाषा मराठी असल्याने कन्नड भाषेची, संस्कृतीची काही माहिती नव्हती. पण याबाबत माहिती करून घेतली. थोडय़ाफार प्रमाणात कन्नड भाषाही शिकले. माझे संवाद मी मराठीतून (देवनागरी) लिहून घेऊन त्याचा अर्थ समजावून घ्यायचे. सेटवर कन्नड भाषा शिकविणारे शिक्षक असायचे. त्यांच्याकडून शब्दोच्चार जाणून घ्यायचे. काही वेळा त्यांच्याकडून कन्नड शब्द, वाक्ये ध्वनिमुद्रित करून घेऊन ती सतत ऐकायचे. भूमिका साकारताना आपण मराठी भाषक आहोत याची आणि संवादावर मराठी शैलीची छाप राहणार नाही याचीही विशेष काळजी घेतल्याचे तिने सांगितले.
मी मूळची सांगलीची. शाळेत असताना स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम यातून मी भाग घ्यायचे. राजेंद्र पोळ यांचे मार्गदर्शन त्यावेळी लाभले. पुण्यात आल्यानंतर काही नाटकेही केली. पुढे ‘चार दिवस सासूचे’, ‘तुजवीण सख्या रे’ आदी मालिकाही मी केल्या. ‘कॅरी ऑन मराठा’ हा माझा प्रदर्शित होणारा चौथा चित्रपट आहे. या अगोदर ‘३१ डिसेंबर’, ‘मध्यमवर्ग’ आणि ‘डब्बा ऐसपैस’ या मराठी चित्रपटांतून मी काम केले आहे. आगामी दोन मराठी आणि तीन तेलुगू चित्रपटांत काम करत असल्याची माहितीही तिने दिली.
गश्मीर महाजनी या तरुण अभिनेत्याच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला देखणा, उमदा आणि पीळदार शरीराचा ‘हीमॅन’ नायक लाभला आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा अशी ओळख असलेल्या गश्मीरचा ‘कॅरी ऑन मराठा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तर ‘देऊळबंद’ हा आणखी एक चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. गश्मीरच्या ‘कॅरी ऑन मराठा’ या चित्रपटात त्याची नायिका असलेल्या कश्मिरा कुलकर्णी या अभिनेत्रीचा प्रदर्शित झालेला हा चौथा चित्रपट आहे. मराठीसह कश्मिरा तेलुगू चित्रपटातही काम करते आहे. ‘कॅरी ऑन मराठा’च्या निमित्ताने गश्मीर व कश्मिरा यांच्याशी शेखर जोशी यांनी साधलेला संवाद..