बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील मोठे कलाकार सलमान खान, करण जोहर, संजय लीला भंसाली आणि एकता कपूर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेशानं वकील असलेल्या सुधीर कुमार ओझा (Sudhir kumar Ojha) यांनी बिहारमधील मुझफरपूर येथील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भात एएनआयशी बोलताना सुधीर यांनी, ‘या तक्रारीमध्ये सुशांत सिंह राजपूतला सात चित्रपटातून काढण्यात आले आणि काही चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. या ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडले’ असा आरोप त्यांनी केला आहे. सुधीर यांनी आठ कलाकारांविरोधात तक्रार दिली आहे. त्यामध्ये सलमान खान, करण जोहर, संजय लीला भंसाली, एकता कपूर आणि बॉलिवूडमधील इतर लोकांचा समावेश आहे.

यापूर्वी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सुशांतने सात चित्रपट साईन केले होते. ते त्याच्या हातून गेल्याचे म्हटले होते. ‘छिछोरे चित्रपट हिट झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूतने सात चित्रपट साइन केले होते. सहा महिन्यातच त्याच्याकडून ते चित्रपट गेले. का? फिल्म इंडस्ट्रीमधील निष्ठुरता एका वेगळ्याच पातळीवर काम करते. याच निष्ठुरतेने आज एका प्रतिभावान कलाकाराचा जीव घेतला आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

रविवारी, १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. सुशांतच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. त्याने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१३मध्ये त्याने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या.