अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटावर सेन्सॉरची नजर पडली आहे. या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉरने आक्षेप घेत ते दृश्य चित्रपटातून वगळण्याचा सल्ला दिला आहे. चित्रपटातील एका दृश्यामध्ये अभिनेता सूरज शर्मा बाथटबमध्ये ‘शशी’च्या भटकत्या आत्म्याला पाहून घाबरतो आणि त्या भितीने तो हनुमान चालिसेचा जप करण्यास सुरुवात करतो, असे दृश्य दाखवण्यात आले आहे. याच दृश्यावर हरकत घेत सेन्सॉरने चित्रपटातून ते दृश्य काढून टाकण्यास सांगितले.
हनुमान चालिसेचा सतत जप केल्यामुळे ते भूत जाईलच असे नाही. त्यामुळे या दृश्यातून अंधश्रद्धेस सुद्धा वाव मिळू शकतो, म्हणूनच या दृश्याला सेन्सॉरची हरकत आहे. त्यासेबतच या दृश्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असेही कारण देण्यात येत आहे.
‘द क्वींट’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या चित्रपटातील हनुमान चालिसा हटवण्यात आली असून, आता अभिनेता सूरज शर्मा हनुमान चालिसा नव्हे तर कोणत्यातरी एका मंत्राचा जप करताना दिसणार आहे. पण, हा जप प्रेक्षकांना मात्र ऐकू येणार नाही.’ त्यामुळे आता नेमके हे दृश्य चित्रपटातून वगळण्यात आले आहे की नाही हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कळणारच आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ‘फिल्लौरी’ विषयीच्या विविध चर्चांना उधाण आले आहे. बहुविध मार्गांनी या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अभिनेत्री अनुष्का शर्मा, दिलजित दोसांज आणि सूरज शर्मा बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. या चित्रपटाच्याच प्रसिद्धीचा एक भाग म्हणजे #ShashiWasThere हा हॅशटॅग. या हॅशटॅगच्या मदतीने अभिनेत्री अनुष्का शर्मा या चित्रपटात साकारत असलेल्या ‘शशी’च्या आत्म्याच्या रुपात अगदी ऑस्करच्या सोहळ्यापासून ते किंग खानच्या मन्नत बंगल्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठीची ही अनोखी शक्कल सध्या यशस्वी होत आहे हेच खरे.