अॅक्टिंग वहीं से शुरू होती है, जहाँ वो खडे होते है..’ शाहरूख खानच्या या एका वाक्याबरोबर टाळ्यांच्या कडकडाटात अभिनयाचा बेताज बादशाह अमिताभ बच्चन यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. लाइफ ओके स्क्रीन वार्षिक पुरस्कार सोहळ्यातला हा क्षण अमिताभ बच्चन यांनी जिंकून घेतला. व्यावसायिकतेच्या चौकटीत राहून आशयात्मक चित्रपटांची कास धरणाऱ्या राकेश ओमप्रकाश मेहरा, शुजित सिरकार यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी यंदाच्या स्क्रीन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.
वांद्रे-कुर्ला संकुलात मंगळवारी रंगलेल्या स्क्रीन वार्षिक पुरस्कार सोहळ्यात आपलाच अभिनेता मित्र शत्रुघ्न सिन्हा आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना एक खूप मोठा प्रवास आज पूर्ण झाला आहे, अशी भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली. कालच तर आलो होतो, या इंडस्ट्रीत. आणि बघता बघता ४५ वर्षे कशी उलटली, कळलेच नाही. असे सांगणाऱ्या अमिताभ यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांचे असल्याचे सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्क्रीनच्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील सर्वच तारे-तारकांनी आवर्जून हजेरी लावली. गेल्या वर्षी या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करणाऱ्या वरूण धवन याने यंदा या मंचावर धमाकेदार नृत्याविष्कार सादर केला. ‘रामलीला’मधील आपल्या अदाकारीने सर्वाना घायाळ करणाऱ्या दीपिका पडुकोणेने याच चित्रपटातील ‘ढोल बाजे’ गाण्यावर ठेका धरला आणि सर्वच प्रेक्षकांनी तिला टाळ्यांची पावती दिली. अत्यंत अतरंगी गाण्यांमुळे एक काळ गाजवलेल्या गोविंदाच्या गाण्यांवर रणवीर सिंगने ताल धरत शिट्टय़ा वसूल केल्या. यंदाच्या पुरस्कारांचे वैशिष्टय़ म्हणजे यंदा पहिल्यांदाच सवरेत्कृष्ट स्टंट्स किंवा साहसदृष्यांसाठी पुरस्कार देण्यात आला. हा पहिलाच पुरस्कार मद्रास कॅफे या चित्रपटासाठी मनोहर वर्मा यांना प्रदान करण्यात आला. तर रामनाथ गोयंका चित्रपट पुरस्कारावरही यंदा मद्रास कॅफे या चित्रपटाने मोहोर उमटवली. हा पुरस्कार विवेक गोयंका यांनी जाहीर केला. याशिवाय परीक्षकांतर्फे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार यंदा शीप ऑफ थिसिअस या चित्रपटाला देण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा