दुबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘कलर्स मिक्ता’ पुरस्कार सोहळ्याची रंगत वाढत चालली आहे. बुधवारी झालेल्या सेलिब्रिटींच्या क्रिकेट सामन्यानंतर गुरूवारी सायंकाळी अबुधाबी येथील अलरहाबीच रिसॉर्टवर कलाकारांमध्ये पुन्हा व्हॉलिबॉलचा सामना रंगला.
‘खोपकर दबंग’(अमेय खोपकर), ‘कलानिधी फायटर्स’(सुशांत शेलार), ‘भांडारकर बुल्स’, ‘अ‍ॅन्जीलो लायन्स’ (महेश मांजरेकर) यांच्या संघांमध्ये व्हॉलिबॉलचा खेळ खेळवण्यात आला. चुरशीच्या या सामन्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘अ‍ॅन्जीलो लायन्स’ संघानेच विजयावर शिक्कामोर्तब केले.
 अवधूत गुप्ते यांचा वाढदिवस साजरा
गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि ‘रमा माधव’ चित्रपटातील तरूण रमा साकारणारी अभिनेत्री पर्ण पेठे यांचा वाढदिवस व्हॉलिबॉल सामन्यांनंतर अलरहाबीचवरच साजरा करण्यात आला. तमाम मराठी चित्रपटसृष्टीच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या सामन्यांच्यावेळी खास उपस्थित राहिल्या होत्या. त्यांच्यासह सर्वच कलाकारांनी अवधूत गुप्ते आणि पर्ण पेठे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अवधूत गुप्ते यांनी एक गाणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. शुक्रवारी रंगलेल्या ‘कलर्स मिक्ता’ पुरस्कार सोहळ्याचे विशेष प्रसारण पुढील महिन्यात ई टीव्ही मराठीवरून केले जाणार आहे.

Story img Loader