वर्षभराच्या वादविवादानंतर, चाचण्यांनंतर ‘मॅगी’ची सुटका झाली आणि ती पुन्हा खवय्यांच्या डिशमध्ये येऊन विसावली. पुन्हा ‘मॅगी मॅगी’ आणि ‘फक्त दोन मिनिट’ची गुंज सुरू झाली मात्र मॅगीच्या जाहिरातींमधून लोकांना भुरळ घालणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांसारख्या सेलेब्रिटींचे चेहरे गायब झाले. ‘मॅगी’त शिशाचं प्रमाण जास्त होतं आणि ती आरोग्याला हानिकारक होती हा वाद बाजूलाच राहिला. मात्र अमिताभसारखा लोकप्रिय अभिनेता अशा शिसेयुक्त ‘मॅगी’ची जाहिरात कशी करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली. ज्या कलाकारांनी मॅगीच्या जाहिराती केल्या त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली. आता या मागणीला कायद्याच्या चौकटीत बसवत अशा प्रकारे चुकीच्या उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या सेलेब्रिटींना लगाम घालण्याचे प्रयत्न सरकारी स्तरावर सुरू आहेत. संसदेत या विषयावर चर्चा सुरू असून चुकीच्या उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. यासंदर्भातील बैठक पुन्हा एकदा १९ एप्रिलला होणार आहे. मात्र एखादं उत्पादन चुकीचं असेल तर त्याला संबंधित कलाकार जबाबदार कसे? इथपासून ते सरकारची यासंदर्भात कुठलीच जबाबदारी नाही का? कलाकारांना पकडून उत्पादनांची गुणवत्ता सुधारलीजाणार आहे का, असे अनेक मुद्दे जाहिरात कंपन्या, नावाजलेले जाहिरात दिग्दर्शक आणि बॉलीवूड कलाकारांनी उपस्थित केले आहेत.
सध्या टुथपेस्ट, तेलापासून घराच्या रंगांपर्यंत आणि कोक, पेप्सीपासून बिस्लेरी पाण्यापर्यंत सगळ्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सेलेब्रिटी कलाकारांचेच चेहरे दिसतात. बॉलीवूड कलाकार जेव्हा जाहिरात करतात तेव्हा त्यांच्यावर लोकांचा चटकन विश्वास बसतो. कित्येक कलाकार हे ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत. त्यामुळे लोकप्रियतेबरोबरच त्यांची प्रतिष्ठाही ग्राहकाला त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते. अनेकदा बॉलीवूड कलाकार अमुक एक उत्पादन वापरतात म्हणून ते वापरणाऱ्या लोकांचीही संख्या खूप मोठी आहे. मात्र कलाकार ज्या उत्पादनांची जाहिरात करतात त्याची गुणवत्ता, दर्जा चांगला नसेल तर अंतिमत: फसवणूक ही लोकांची होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मुळात कलाकारांनी अशा फसव्या उत्पादनांच्या जाहिराती बंद केल्या पाहिजेत. त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जावी. पहिल्या गुन्ह्यासाठी १० लाख रुपये, दुसऱ्यांदा चुकीची जाहिरात केली तर त्याला पन्नास लाख रुपये दंड आणि पाच वर्षे तुरुंगावास अशी कारवाई केली जावी, या स्वरूपाचं विधेयक मांडण्याचा विचार केंद्रीय स्तरावर सुरू आहे. त्यासंदर्भातील समिती लवकरच या प्रस्तावाला निश्चित स्वरूप देणार आहे. सरकारच्या या प्रस्तावावरून कलाकार आणि जाहिरात दिग्दर्शकांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आहेत.
एखाद्या उत्पादनाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जबाबदारी घेण्याआधी त्याची गुणवत्ता तपासण्याचं भान कलाकारांना असते का, असा पहिला प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र कलाकार संबंधित उत्पादनांचे तपशील जाहिरात कंपन्यांकडून घेतात, असा जाहिरातदारांचा अनुभव आहे. मात्र कुठल्याही उत्पादनाबद्दल फार कमी माहिती कलाकारांना असते. प्रत्येक उत्पादन तपासून घेण्याइतपत योग्य मार्गदर्शक, तज्ज्ञ आमच्याकडे उपलब्ध नसतात. पण एखाद्या गाडीची जाहिरात असेल तर संबंधित कंपनीची माहिती, नवीन गाडीबद्दलचे तपशील समजून घेऊनच आम्ही निर्णय घेतो. किंवा एखाद्या उत्पादनावर ‘आयएसआय’ मार्क असेल तर ते संबंधित सरकारी विभागाकडून प्रमाणित आहे, असाच तर्क आम्ही लावतो. त्यामुळे कलाकार म्हणून आमची जबाबदारी फार मर्यादित असते, अशी भूमिका शाहरुखने घेतली आहे. मात्र कलाकार जाहिरात करण्यासाठी इतके पैसे घेतात तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून एखाद्या उत्पादनाची चौकशी करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी काहींची नेमणूक ते सहज करू शकतात. किंबहुना त्यांनी तसं केलं पाहिजे, अशी आग्रही भूमिका ‘करी नेशन’ या जाहिरात कंपनीच्या संचालक प्रीती नायर यांनी मांडली. काही कलाकार खरोखरच त्या उत्पादनांचा दावा तपासून बघतात. मात्र प्रश्न येतो तो ‘कोक’सारख्या किंवा लहान मुलांना धोकादायक ठरणाऱ्या उत्पादनांच्या जाहिरातींबाबत.. आपल्याकडे जवळपास सगळे मोठे बॉलीवूड कलाकार पेप्सी, कोकसारख्या शीतपेयांची जाहिरात करतात. ही शीतपेयं आरोग्याासाठी धोकादायक आहेत याची सगळ्यांना माहिती आहे मात्र कलाकारांनी स्वत: जबाबदारी घेऊन अशा जाहिराती न करण्यावर ठाम असलं पाहिजे, असं मत प्रीती नायर यांनी मांडलं.
प्रसिद्ध जाहिरातकार आणि चित्रपटकर्मी आर. बाल्की यांच्या मते फसव्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी कलाकारांना जबाबदार धरणं चुकीचं आहे. गेल्या काही वर्षांत जाहिराती करताना मुळात त्या लोकांच्या भावनिक, आर्थिक, सामाजिक गरजांशी कशा जोडलेल्या आहेत याचा विचार करूनच त्याची मांडणी केली जाते. त्यामुळे जाहिरात कंपन्याही संबंधित उत्पादनाची काळजी घेतात आणि कलाकारही त्या उत्पादनांची माहिती घेतात. मात्र कलाकार आणि जाहिरातदारही त्यातले तज्ज्ञ नसतात त्यामुळे त्यांना कायद्याने अडकवणं योग्य नाही, असं मत बाल्की यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी सरकारने त्या उत्पादनाची आणि त्यावर तयार झालेल्या जाहिरातीची चौकशी करणारा किंवा त्यावर नियंत्रण ठेवणारा एक स्वतंत्र विभाग नेमला पाहिजे, असं बाल्की यांचं म्हणणं आहे. मात्र इथेही अडचण आहे. कारण जाहिरातींवर नियंत्रण ठेवणारी ‘आस्की’ (एएससीआयआय) सारखी यंत्रणा आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या जाहिराती करू नयेत, असं ‘आस्की’चंही नियम आहेत. त्यामुळे त्या त्या नियमांच्या बंधनात राहून जाहिरातींवर नियंत्रणठेवलं जातं. तरीही गोविंदा, रोनित रॉय सारखे अनेक कलाकार आयुर्वेदिक तेल, स्लिम टीसारख्या उत्पादनांची जाहिरात करताना दिसतात. हे लक्षात घेऊन यासंदर्भात, ‘फसव्या’ उत्पादनांची जाहिरात असं म्हणतात ‘फसव्या’ या शब्दाची नेमकी व्याख्या करण्याची सूचना संबंधित समितीने केली आहे.
अशा प्रकारच्या चुकीच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी कलाकारांना जबाबदार धरलेच पाहिजे, असं प्रीती नायर म्हणतात. पण अशा प्रकारे कायदेशीर कारावाई संदर्भातील नियम करताना प्रमाणित उत्पादनं आणि चुकीची उत्पादनं यात योग्य तो फरक असला पाहिजे. ‘कोक’मध्ये कॅफिन असतं पण ‘एफडीए’ने जर ते प्रमाणित केलं असेल तर ते चुकीचं ठरणार का? यात फरक करणारी रेषाच धूसर आहे. त्यामुळे याबद्दल सर्व बाजूंनी विचार करून निर्णय झाला पाहिजे, असं मत प्रीती नायर यांनी व्यक्त केलं. पण, इतक्या घाईने हा प्रस्ताव मांडत असताना कलाकारांना सहजसोपं लक्ष्य केलं जात असल्याची तक्रार प्रल्हाद कक्कर यांच्यासारख्या नावाजलेल्या जाहिरात दिग्दर्शकाने केली आहे. उत्पादनाच्या जाहिरात निवडीची तात्त्विक जबाबदारी कलाकारांवर असते. पण त्याच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल कलाकारांना का धारेवर धरणार? मग त्या उत्पादनांची तपासणी करणाऱ्या आणि त्यांना प्रमाणित करणाऱ्या विविध विभागांचं काय, असा प्रश्नही जाहिरातदारांनी उपस्थित केला आहे.