प्रस्तुत संवाद हा दोन वृत्तींमधला आहे.
आता वृत्ती कशी निर्माण होते, विवेकाशी सांगड घालता येईल काय? बुद्धय़ंकाच्या कसोटीवर वृत्तीला तोलता येईल काय? असे प्रश्न उपस्थित करून कारणमीमांसा करण्याची फार गरज नाही, त्यानं मूळ विषयाला फाटा फुटतो व विषय भरकटतो..
तसेच, प्रस्तुत संवाद (वृत्ती संवाद) वाचताना.. अरे बापरे, हा तर मीच आहे.. असं कुणाला वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.. तद्वतच प्रस्तुत संवाद वाचताना
पृष्ठाच्या मधोमध, सिनेमात दिसतं तसं स्वत:चं प्रतिबिंब (छबी म्हणा हवं तर) दिसल्यास ही केवळ आपल्या मनाची समजूत आहे असं स्वत:ला सांगून तीस दूर लोटावं जसं आपण नेहमी करतो..
चल हट, मी तर खूप चांगला माणूस आहे, असं स्वत:शी पुटपुटावं. एकटं असल्यास मोठय़ानं म्हणावं. त्यानं धीर येतो आणि आपण खरोखरच चारित्र्यवान आहोत असं वाटतं व जगणं सुकर होतं..
एक- कशाला..? कशाला मेणबत्त्या..?
दोन- अरे, चल ना मेणबत्त्या घेऊन येऊ आणि जाऊ तिकडे बदायूं- उत्तर प्रदेशला.
एक- उत्तर प्रदेश..? अरे, किती लांब आहे ते..? तिकडे कुणी ओळखीचं पण नाही आपल्या..
दोन- हे बघ. ओळख कशाला पाहिजे. तिकडे जाऊ आपण आणि त्या दोन मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांचा खून झाला ना. आपण मेणबत्त्या पेटवून निषेध करू..
एक- अरे, आपल्याला काय करायचंय.. यार ते यू. पी. जाणो आणि त्यांचे लोक आपण कशाला मध्ये पडायचं..
दोन- आपलीच आई-बहीण असती तर
एक- नीट बोल रे.. दात पाडून हातात देईन.. माझी बहीण असती ना, तिला असं कुणी केलं असतं ना त्याला नागडा करून लटकवला असता.
दोन- हो.. सॉरी बाबा.. पण आपण फक्त निषेध तरी करू.
एक- मजा नाही रे..
दोन- निषेधात कसली मजा..?
एक- तू बघ ना.. आपण इतक्या लांब जाणार कुणाला कळणार पण नाही आणि लोकांना कळलं पाहिजे रे, की आपण निषेध-फिषेद करतो ते.. गर्दी नाही, कॅमेरे नाही.. आणि यू.पी.तले आपल्याला टी.व्ही.वर दाखवणार पण नाही आणि समजा दाखवलं तर यू.पी.मध्येच. तिकडं आपलं कोण नाही. मायलेज नाही दोस्ता.. मायलेज मिळत नाही..
आता तूच बघ, दिल्ली-मुंबईला काय असा लोचा झाला तर कशा लगेच सगळय़ा अेन्जॉय गोळा होतात.
दोन- एन.जी.ओ.
एक- तेच रे.. शेवटी काय सगळे असे मेणबत्त्या घेऊन त्या रॅलीमध्ये निघाले की काय फ्रेश वाटतं.. सगळे पत्रकार कॅमेरेवाले, चॅनेलवाले.. आपल्याला महत्त्व
देत असतात.. तेव्हा एकदम मजा येते आणि असं वाटतं अशी रॅली मेणबत्त्या घेऊन रोज निघावी.
दोन- अरे, पण हे सगळं त्या संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून करतात. त्यांचं ते व्रत असतं. तुझ्यासारखा टाइम पास नसतो
एक- तू वेडा आहेस.. तुला अक्कल नाही आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे. मायलेज मिळालं पाहिजे. त्यात साल्या निवडणुका पण संपल्या. पॉलिटिकल
मायलेज पण नाही मिळणार.. दोस्ता, ज्याच्यात नाव होत नाही अशा समाजकार्यात आपण भाग घेत नाही लोक समाजसेवा करतात मान्य आहे, इथं मला माझी सेवा करणारे निर्माण करायचेत. कुणी पैसे, फंड देत असेल तर बघ, बनियान, टी शर्ट छापून दिले तर बघ जमलं तर येईन.. नाहीतर जा एकटाच.
दोन- नको रे बाबा- एकटा.
ते म्हणतील याला काही बॅकिंग आहे की नाही.. मी मनातल्या मनातच करतो निषेध.
ता.क.
उपरोक्त संवाद हा दोन मृत व्यक्तींमधील आहे. कारण अशा वृत्ती जगून उपयोगच नाही.
– मिलिंद शिंदे