‘साडेचारशे रुपये होतील…’
शब्दांत ती मग्रुरी आणता येत नाही. पण तोंडात मावा किंवा तत्सम पदार्थ, दाढी कशीही वाढलेली, शर्टाची कमीतकमी, जवळजवळ न लावलेली बटणं आणि नशेनंच झालेले लालबुंद डोळे, असा ऐवज असलेला माणूस जर वरील वाक्य उच्चारत असेल तर कुणीही, शक्यतो महाराष्ट्रीयन माणूस लगेच ओळखेल, ‘हा तर मग्रूर रिक्षावाला.’
आता पुन्हा आठवून पाहा, तुम्हाला तंबाखूची तांबूस थुंकी (लाळ) तोंडातल्या तोंडात कालवत बोलणारा रिक्षावालाच दिसेल.
‘साडेचारशे रुपये होतील’ असं काहीतरी थुंकीच्या बुडबुडय़ासह ते बोलतात.
एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना जितके पैसे होत नाहीत, त्याहून अधिक पैसे शहराच्या बसस्थानकापासून त्याच शहराच्या एका भागात जायला हे रिक्षावाले आकारतात.
‘पेट्रोलचे भाव किती वाढलेत..’
हे देश स्वतंत्र झाल्याच्या आधीपासूनचं वाक्य ते वापरतात. जणूकाही पेट्रोल स्वस्त झाल्यावर सौजन्यानं हेच भाव कमी करतात.
काही बोलायला जावं तर लगेच पाच-सात जण काय झालं, काय झालं.. करत जमा होतात.
आपण आणखी गुदमरतो. अंगावर धावून येतात.
युनियन असते ना यांची. मग..?
‘मीटरनं चला ना..’
असं म्हटल्यावर ‘भारत छोडो’ असं इंग्रजांना म्हटल्यावर त्यांनाही नसेल आला इतका राग रिक्षावाल्यांना येतो.. आपण त्यांचं चारित्र्य (?)हनन करणारं काहीतरी बोललो, असा त्यांचा
आविर्भाव असतो. इतका त्यांना मीटरचा कंटाळा.
‘खट्याक’ करून मीटर टाकलं तर त्याचा हात जागेवर मोडेल की काय अशीही त्याला भीती असावी.
काही शहरांत तर रिक्षांना मीटरच नाहीत.
विषयच संपला.
आणि कुणी यांना ‘मीटरनंच चला’ असा आग्रह धरला तर टॅक्सीचं टेरिफ कार्ड दाखवून गंडा घालणारे महाभागही यांच्यात आहेत. ‘टॅक्सी/रिक्षा मीटर कार्ड’ यातल्या टॅक्सी या शब्दावर अंगठा ठेवायचा. रिक्षा मीटर कार्ड तयार होतं. आपल्या खिशातलं वजनही हलकं होतं.
‘नाईट चार्ज’ रिक्षावाले स्वत:च्या लहरीनं, मूडवर, प्रवाशाचा आर्थिक स्तर, वेळ, बौद्धिक कुवत, असहायता यावरून ठरवतात. एका प्रवाशाचा नाईट चार्ज रात्री ११ ते ४ असेल तर दुसऱ्याचा १२ ते ६ असा आणि इतका बदलता असू शकतो.
‘तिकडून एम्टी यावं लागतं’ या रिक्षावाल्याच्या युक्तिवादावर सामान्य प्रवासी काय बरं उत्तर देणार?
आपल्याला ज्या ठिकाणी रिक्षाला (रिक्षावाल्यासहित) घेऊन जायचंय त्या ठिकाणाहून परत रिक्षा याच ठिकाणावर येणारं प्रवासी नाही ना तयार ठेवू शकत. रिक्षावाल्यासाठी परतीची प्रवाशांची सोबत, सोय करण्याची सामान्य माणसाची अजून तयारी झालेली नाही. हळूहळू करावीच लागेल अशी परिस्थिती आहे.
त्यात संप/बंद असेल तर काही विचारूच नका.
एकतर अचानक बंद केल्यावर त्यांना नागरिकांना वेठीस धरायला जी मजा येत असेल ना..
रिक्षावाल्यांसाठी मनोरंजनाचा परमोच्च बिंदूच तो..
संपाच्या दिवशी (अर्थात भाडेवाढीसाठीच) त्याच्या चेहऱ्यावर जे भाव असतात, जणूकाही काय केली ना तुमची गोची, मज्जा, गंमत इ.इ.
लोकांना होणारा त्रास आपल्यामुळेच होतोय आणि आपण याला मदत केली तर याचा त्रास संपेल, पण होऊ दे तुला त्रास, मला मजा बघू दे. नागरिकांच्या त्रासाची निर्दयी मजा घेणारा तो रिक्षावाला… याला पेशंट कळत नाही, वृद्ध कळत नाहीत, मागून येणारी अॅम्ब्युलन्स कळत नाही..
मेहनतीपेक्षा जास्त पैसे देऊनही कामात कुचराई करणारा बेजबाबदार रिक्षावाला..
काही लोकांनी संशोधन केलंय की चांगलेही रिक्षावाले आहेत.
आम्हाला नाही ना दिसत..
आहेत, असतीलही, पण …
ता.क.-
एका रिक्षावाल्यानं दुसऱ्या रिक्षावाल्याच्या रिक्षातून रात्री एकदा सहकुटुंब प्रवास करून पाहावा. अडचण नाही आली तर समजायचं त्यानं तुम्हाला ओळखलंय, हा तर आपलाच व्यवसायबंधू.
-मिलिंद शिंदे
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)