कट…
डायरेक्टर साहेबांचा आवाज… जोडून टाळ्या…
हे अलीकडं सातत्यानं घडतं. ‘कट्’ असं म्हणलं की कॅमेऱयाच्या समोरच्या माणसानं (कलाकारानं) सोडून बाकीच्यांनी त्याला दाद द्यायची, टाळ्या वाजवून.
समोरच्या कलाकाराच्या कानात या टाळ्या पडतात आणि तो सुखावतो, नव्हे नव्हे या टाळ्या पडल्या नाहीत तर त्याला करमत नाही. कधी-कधी आपलं काही चुकलं असं वाटतं तर कधी या लोकांना काय कळणार माझी अॅक्टिंग वगैरे विचार करून स्वतःची समजूत काढतो. पुढच्या शॉटची वाट पाहत खुर्चीत विसावतो…
अभिनेता… त्याच्या मते ‘अॅक्शन’ आणि ‘कट’ या दोन शब्दांदरम्यान जे घडायला हवं ते आपण चोख करतो… आणखी काय पाहिजे…?
जमलंच तर ज्ञानात भर पडावी म्हणून वाचन करतो आणखी काय पाहिजे…?
वेळेत येतो… संपेपर्यंत थांबतो आणखी काय पाहिजे…?
अशा प्रकारचा विचार करत आम्ही नटमंडळी किंवा आमच्यापैकी काही आपलं काम करत असतात…
पण मध्यंतरी एक संवाद कानावर पडला आणि थोडं थांबायला झालं…
घटकाभर वाटलं… हो… हे करायला हवं…
असा विचार करायला हवा…
तो संवाद असा…
इतके पैसे…? – एकजण
हो… पण काही फायदा नाही झाला… – दुसरा
चित्रपट निर्मितीवर होणाऱया खर्चावर दोघांची चर्चा.
मला काय वाटतं, आपण १०० रुपये टाकले की किमान ११० तरी आले पायजे… पण या सिनेमा धंद्यात पैसे यायची सोयच नाही… थोडं नुकसान झालं…
गम्मत पुढे आहे… एकवक्ते माझ्याकडे वळले मला म्हणाले, मला थोडं वेगळं वाटतं… ते पुढे बोलू लागले… “पिक्चर काढायची मजा यायला पाहिजे… आपण त्या गोष्टीचा आनंद घ्यायला पायजे… सिनेमाले खर्च होतोच… आता इतक्या लोकांना काम म्हणजे पैसे देणं आलंच…
आपलं तर म्हणणं आहे. १०० रुपये लावले तर १०० जरी आले तरी चालतं मला… जेवढे लावले तेवढे परत आले तरी बसं ना…?
आणि जे लोक नफा नफा म्हणतात तर बॉ नफा म्हणून आनंद सिकवला असं म्हणू… त्याचं मोजमाप थोडचं करता येते.”
नफा म्हणून आनंद. मला कल्पना भारी आवडली. बोलणारे गृहस्थ तुकाराम भाऊ होते.
आहे का याचं काही मोजमाप…?
पैशाचा नफा नोटात मोजता येईल. पण माझ्या या आनंदाचा नफा… मोठ्ठाच नं…? आणि लोकांना वाटते पैसे गेले पैसे गेले…
पण ज्यांना ती ट्रॉफी मिळते… राष्ट्रीय पुरस्कारांची त्याचं काय…?
अवो कितीही पैशाचा सिनेमा काढा… बिग बजेट काढा…
राष्ट्रीय पुरस्कार मिळणं अवघड की नाही…?
मग…?
त्या आनंदाची, त्या पुरस्काराची मजा त्याचीच ना…?
त्यांच्या डोळ्यात मला राष्ट्रीय पुरस्काराबद्दलचा आदर दिसत होता. त्याबद्दल निष्ठा झळकत होती. अविरत…
तुकारामभाऊंनी मांडलेलं गणित आपल्याही आसपास फिरत असतं… पण त्या दिवशी त्यांच्या बोलण्यात आनंद मानण्याचं गणित कळलं…
खरच की आपण कलावंत कितीतरी काम करत असतो पण असा विचार येत असला मनात तरी त्याला बाजूला ठेवून आपण आनंद शोधत असतोच.
राष्ट्रीय पुरस्कार…
प्रत्येक कलावंतासाठी स्वप्न. एक पूर्णत्वाच्या प्रवासाची सुरुवात.
अशा पूर्णत्वाच्या प्रवासासाठी सुरुवात करायला प्रत्येक कलावंताला आवडत असतंच.
माझा एक मित्र म्हणतो, “चांगला सिनेमा काढायला खूप पैसे लागत नाहीत. किचन चालवायला लागतात…”
काय पाहिजे…?
मला हे असं आनंदात नफा शोधण्याचं तंत्र शिकायचंय (अवघड आहे ते…?)

ता.क.
माझे आवडते लेखक राजन खान म्हणतात, “पहिल्याच प्रयत्नात नोबेल मिळेल असं वाटू देऊ नका… प्रयत्न करा…”
– मिलिंद शिंदे

Story img Loader