राजा गल्ल्यात हात घालायचा आणि जे हातात येईल ते मला द्यायचा.
दानत लागते
हे मी बऱ्याच वेळा बोलतो बोलताना…
शांत बसलेल्या माझ्याकडे पाहात तो विचारायचा…
काय…?
मुंबईला जायचंय… मी.
कधी..?
कधी जाऊ…? मी.
मग तो गल्ल्यात हात घालायचा.
बस्स! माझं मुंबईला जाणं निश्चित व्हायचं…
नट म्हणून त्याला तेव्हा (आणि मला आताही) काय पोटेन्शिअल दिसलं कुणास ठाऊक…?
पोटेन्शिअल कसलं..? मैत्रच ते…
पण जमतील तेवढे पैसे द्यायचा…
तेव्हा तोही त्याचा जम बसवत होता धंद्यात
पण स्वत:चा जम बसवताना इतरांना हात देणारे काही असतात
राजा त्यातला.. त्यातला राजा.
—
गेली का आई ऑफिसला…?
मी संतोषला विचारायचो..
तोही जणूकाही माझा फोन येणार म्हणून फोन जवळच बसलेला…
कधीकधी तर मी त्याच्या घराच्या आडून त्याच्या
आईला ऑफिसला जाताना पाहून त्याच्या घरी जायचो,
मग नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण एकाच वेळी करायचो.
संतोष त्यातलं थोडंफार खायला पण बऱ्यापैकी माझ्या पोटात कसं जाईल अशी व्यवस्था करायचा,
वर शेंगा आणि फलाहार होताच संध्याकाळपर्यंत.
संतोष नसता तर मला अशीच मरायची वेळ होती.
(घरचे बीडला आणि मी एकटा नगरला.)
योग्य वेळी अन्नदाता मिळाला.
ददात मिळायची…
मग रात्रभर आपलं मुंबईत जाऊन कसं होणार
किती दिवस संतोषला त्रास द्यायचा
या विवंचनेत पापणी मिटायची
आणि पुन्हा उघडायची
ती संतोषच्या घरी जाण्यासाठीच…
खाऊ-पिऊ घालणारे असतीलही
पण हा दुसऱ्याच्या उदरभरणात संतोष मानणारा विरळाच…
—-
हे ठेव
शंभर रुपये देत अभिजित मला निरोप द्यायचा
तारकपूर स्टँडवर…
राजानं दिलेले पैसे, जेवण संतोष घेऊन मी निघायचो
तेव्हा अगदी गाडी हलताना अभिजित हे शंभर रुपये मला द्यायचा.
त्या वेळी तो शिकत होता, कमवायला वेळ होता.
पण त्याला सीसीआरटीची शिष्यवृत्ती मिळायची.
त्यातले शंभर रुपये तो मला दर वेळेस जमेल
तसे द्यायचा.
सीसीआरटी तुम्हाला तुमच्या कलागुणांचा विकास, अभ्यास करण्यासाठी हे विद्यावेतन देत असते, पण आपल्या मुंबईत जाऊन सांस्कृतिक क्षेत्रात मुशाफिरी करू पाहणाऱ्याच्या हातात तो त्यातले शंभर रुपये ठेवायचा.
एका अर्थानं मलाही सीसीआरटीची शिष्यवृत्तीच मिळत होती की अभिजितकडून.
पण त्यानं मला कधी पॅरासाईट वाटू दिलं नाही..
राजा काय, संतोष काय, अभिजित काय…
मी एनएसडीवरून परत आल्यावर माझ्या वडिलांचे कन्फेक्शन बॉक्सच होते.
वडील त्यांना सांगायचे…
‘त्याला सांगा, अजूनही एमपीएससी, यूपीएससी कर..’
हे घरातल्या इतरांनी मला सांगितलं पण यांनी ही गोष्ट कधीही माझ्यापर्यंत येऊ दिली नाही.
तुमच्या ध्येयावर नुसतं तुमचंच लक्ष असून, जमत नाहीतर तुमच्या मित्रांचीही देखरेख हवी हे मला मनोमन वाटतं.. (अर्थात, अजून खूप वाटचाल करायचीय.)
‘चल, काही नवीन लिहायचंय का? हॉटेल बुक करतो दोन-तीन दिवस.’
‘मग हे फालतू आहे’ असं तोंडावर सांगणारा
अमोल दाते काय, नवीन पुस्तक वाचलं की आवर्जून फोन करून सांगणारा अमित काळे, ज्याची माफी मागायची राहिलीय (त्याच्यावर नाटकाच्या कॉन्ट्रिब्युशनवरून मी
उगाचच ओरडलो होतो.) तो मनीष घोलप, गिरीश पोळ, मिलिंद रसाळ, उषा देशमुख, उपेंद्र केसकर, राहुल राजीव, राजळे बंधू, आ. थोरात साहेब., मुंबईतले छाया कदम
तुम्ही छानच फिल्म दिग्दर्शित केली आहे असं म्हणून प्रोत्साहित करणारे संजय खामकर आणि दिवंगत सुहृद मनीष कुलकर्णी
हे माझे वॅलेन्टाईनच की…
याहून वेगळे वॅलेन्टाईन नसतात…
नसावेत.
काही नावं राहिली असतीलच
त्यांनी फोन करून, समक्ष भेटून भांडावं
मला बरं वाटेल…
ता. क.
एकदा इथून तिथे पाहायला हवं…
त्यांचे हात दिसतील पाहा…
मिलिंद शिंदे