‘मला सासू हवी’ या मालिकेने दिप्ती देवी हा चेहरा महाराष्ट्रातील घराघरात पोहचला. आपल्या अभिनयाने दिप्तीने नाटक, मालिका, चित्रपट या तीनही क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘मला सासू हवी’,‘अंतरपाट’,‘परिवार’,‘बडे अच्छे लगते है’ या मालिकांमधून तिने उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अशा अभिनेत्रीचं क्रशही हटके असणारचं ना. तर आपल्या याच हटके क्रशबद्दल सांगतेय दिप्ती….
माझं सुरुवातीपासूनच संगीतावर खूप प्रेम आहे. मी ज्युनिअर कॉलेजमध्ये गेले तेव्हा विज्ञान शाखेत असलेला एक मुलगा अप्रतिम नाट्यसंगीत गायचा. कॉलेजमधल्या सगळ्या स्पर्धांमध्ये तो भाग घ्यायचा. त्यामुळे माझं त्याच्यावर प्रेम जडलं. कारण, तो उत्कटपणे गायचा. मुळात संगीतावर माझं प्रेम असल्यामुळे ज्याचं माझ्या प्रेमावर प्रेम आहे तो मला आवडणारचं. पण तो माझ्याशी सुसंस्कृत मुलाप्रमाणे वागायचा त्यामुळे कोणाचंही हृदय त्याच्यासाठी विरघळेल यात शंका नव्हती. पहिल्यापासून त्याच्या अंगात ती कला होती आणि तो मनापासून ती जपत होता हे मला आवडत होतं. मी तास न् तास त्याचं गाण ऐकायचे. माझं त्याच्यावर क्रश होतं हे मी त्याला कधीच दाखवून दिलं नाही. पण मी सतत त्याच्याशी बोलत राहायचे आणि त्याचं गाण ऐकायचे. कित्येक वेळा गाण्यांच्या स्पर्धांमध्ये माझ्या जवळच्या मैत्रिणीत आणि त्याच्यात टक्कर व्हायची. पण माझ्या मैत्रिणीला वगळून मी त्याच्यासाठी प्रार्थना करायचे की तो जिंकू देत. मी तिला तोंडावर सांगायचे की तू जिंकशील. मात्र मनातून मी त्याच्यासाठी प्रार्थना करायचे. मी शब्दात सांगू शकत नाही इतक छान शास्त्रीय संगीत तो गायचा.
वाचा : देव आनंद यांच्या भावासोबत ही अभिनेत्री होती लिव्ह इनमध्ये; निर्दयीपणे झाली होती तिची हत्या
दिप्ती लवकरच ‘कंडिशन्स अप्लाय-अटी लागू’ या चित्रपटातून सुबोध भावेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती ‘स्वरा’ ही व्यक्तिरेखा साकारत असून ती यात रेडिओ जॉकी आहे. बिनधास्त, मनमौजी अशी तिची व्यक्तिरेखा ती साकारताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी ती म्हणाली की, ‘आरजे’ ची भूमिका ही आव्हानात्मक व तितकीच रंजक आहे. स्वत:सोबत इतरांची मनं आणि मतं जाणून घ्यायची जबाबदारी ‘आरजे’वर असते. या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. स्वतंत्र विचारसरणीच्या स्वराचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ व ‘लग्न’ या दोन्ही गोष्टींकडे आजची पिढी कशा पद्धतीने पाहते यावर कंडिशन्स अप्लाय हा चित्रपट भाष्य करतो.
चैताली गुरव, chaitali.gurav@indianexpress.com
वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या